युएईत जुन्या कार्सचा चाहता
नव्या पिढीला शिकवतोय ऑटोमोबाइलचे खरे मूल्य
युएईत क्लासिक कार्सचा छंद केवळ जुन्या गाड्यांना जमविण्यापुरती मर्यादित नसून ही एक संस्कृती, इतिहास आणि वारसा जिवंत ठेवण्याचे माध्यम ठरले आहे. फलाज अल-मुआल्ला क्लासिक कार्स सेंटरचे प्रमुख खलीफा ओबैद अल घुफली या ध्यासाला नव्या उंचीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्याकडे 200 हून अधिक दुर्लभ आणि क्लासिक कार्सचे आकर्षक कलेक्शन असून यात अनेक ऐतिहासिक महत्त्वाची वाहने देखील सामील आहेत.
60 वर्षीय खलीफा ओबैद अल घुफली यांचे क्लासिक कार्सबद्दलचे प्रेम बालपणापासूनच बहरत गेले. विदेशात प्रवासादरम्यान या जुन्या वाहनांना जवळून पाहिल्यावर आणि समजून घेतल्यावर त्यांची रुची वाढली. हळूहळू हा छंद एक ध्यास अन् मिशनमध्ये रुपांतरित झाला.
या कार्स केवळ धातू अन् यंत्रं नाहीत, तर इतिहासाचे जिवंत तुकडे आहेत. प्रत्येक क्लासिक कारमध्ये एक अनोखी कहाणी असते, जी स्वत:च्या काळातील संस्कृती आणि तांत्रिक विकास दर्शविते असे त्यांनी सांगितले आहे.
क्लासिक कार्स वाचविण्याचे मिशन
खलिफा ओबैद अल घुफली यांनी 2011 मध्ये क्लासिक कार्सचे संरक्षण आणि पुनर्स्थापना (रेस्टोरेशन)चे काम सुरू केले. तेव्हा त्यांचा हा पुढाकार केवळ स्वत:साठी नव्हता, तर ते या कलेला युवांपर्यत पोहोचवू इच्छित होते. याच उद्देशाने त्यांनी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत 12 हून अधिक वयाच्या 40-50 विद्यार्थ्याना क्लासिक कार्सच्या रेस्टोरेशनचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रयत्न युएईच्या सामुदायिक विकास मंत्रालयापर्यंत पोहोचला आज्णि यंदा त्यांना फलाज अल मुआल्ला युवा केंद्रात प्रशिक्षणाची जागा मिळाली. येथे त्यांनी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना केवळ एक महिन्याच्या आत दोन क्लासिक कार्स पूर्णपणे रिस्टोर करविणे शिकविले आहे.