गोमंतक अन् बेळगावचे जुने ऋणानुबंध
खासदार सदानंद तानवडे यांची ‘तरुण भारत’ला भेट
बेळगाव : गोव्याचे खासदार सदानंद तानवडे व डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी रविवारी ‘तरुण भारत’च्या बेळगाव येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. गोमंतकीय आणि बेळगावच्या जनतेचे असलेले ऋणानुबंध या भेटीतून पुन्हा एकदा उलगडण्यात आले. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार सदानंद तानवडे यांनी ‘तरुण भारत’च्या देदीप्यमान वाटचालीचे कौतुक केले. ‘तरुण भारत’ने गोमंतकीय जनतेच्या मनात स्थान मिळविले आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळेच ‘तरुण भारत’ घराघरात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. गोवा मुक्ती संग्राम, बेळगाव-गोवा व्यापार, वाहतूक, सांस्कृतिक देवाणघेवाण यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. डॉ. किरण ठाकुर यांनी खासदार तानवडे व आमदार डॉ. शेट्यो यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन ‘तरुण भारत’च्यावतीने सत्कार केला. यावेळी बेळगावमधील विविध स्तरातील मान्यवर तसेच ‘तरुण भारत’ परिवारातील सदस्य उपस्थित होते.