ओलाचा आयपीओ 2 ऑगस्टला बाजारात
5500 कोटी उभारणार : पहिली इलेक्ट्रीक कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिक यांचा आयपीओ ऑगस्टमध्ये येणार असल्याचे स्पष्ट झाले असून कंपनीने याचदरम्यान आता आयपीओ सादरीकरणाची तारीख जाहीर केली आहे.
सदरचा कंपनीचा आयपीओ 2 ऑगस्टला शेअर बाजारात दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिक 5500 कोटी रुपयांची उभारणी करू शकते, असेही सांगितले जात आहे. या आयपीओच्या माध्यमातून उभारलेली रक्कम सेल निर्मिती कारखान्यातील क्षमता विस्तारासाठी करणार असून उर्वरित रक्कम संशोधन आणि विकासासाठी देखील वापरली जाणार आहे, अशीही माहिती कंपनीकडून दिली गेली आहे.
आयपीओबाबत अधिक जाणुन घेऊया...
ओला या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा पहिलावहिला आयपीओ असून याचदरम्यान समभागाची इशु किंमत 72 ते 76 रुपये प्रति समभाग अशी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. समभाग गुंतवणूकीसाठी 2 ऑगस्टला खुला होऊन 6 ऑगस्टला बंद होणार आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत 8.49 कोटी समभाग विक्रीकरीता असतील तर अग्रवाल हे आपले 3.79 कोटी समभाग विक्रीकरीता सादर करतील. गुंतवणूकीबाबत पाहता 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सा ठेवण्यात आला आहे. सदरचा आयपीओ शेअरबाजारात 9 ऑगस्टला सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 5009 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
? इशु किंमत : 72-76 रुपये प्रति समभाग
? गुंतवणूक कालावधी : 2 ते 6 ऑगस्ट
? रक्कमेचा वापर : निर्मिती क्षमता वाढीसोबत संशोधन विकासासाठी