‘ओला’ची 4 वर्षांनंतर कारपूलिंग सेवा सुरु
सीईओ भावीश अग्रवाल यांची माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ओला कॅब ही एक प्रसिद्ध ऑनलाइन कॅब बुकिंग कंपनी आहे. ओला कॅबचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ओलासाठी नवीन फीचर जाहीर केले आहे. ओला कंझ्युमरने ‘ओला शेअर’ नावाने आपली कारपूलिंग सुविधा पुन्हा सुरू केली आहे. ही सुविधा 4 वर्षांपूर्वी ओला कॅबमध्ये उपलब्ध होती, परंतु कोविड-19 मुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आज 4 वर्षांनंतर ओलामध्ये ही सुविधा पुन्हा जोडण्यात आली आहे. सीईओ भाविश अग्रवाल यांनी 15 ऑगस्ट रोजी ओलाच्या वार्षिक सामुदायिक कार्यक्रम ‘संकल्प’मध्ये या सुविधेची घोषणा केली होती.
परवडणाऱ्या राइड्ससाठी पुन्हा सेवा आणतोय
सीईओ भाविश अग्रवाल यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘आम्ही परवडणाऱ्या राइड्ससाठी ओला शेअर परत आणत आहोत. यावेळी एआय पॉवर्ड अल्गोरिदमसह अनुभव खूपच चांगला आहे.. आम्ही लवकरच इतर शहरांमध्ये विस्तार करण्याचा विचार करू.’ असेही त्यांनी सांगितले.
उबरची दिल्लीमध्ये ग्रुप राइड्स व रॅपिडोची बंगळुरूमध्ये सेवा
उबरने दिल्लीमध्ये ग्रुप राइड्स व रॅपिडोने बंगळुरूमध्ये सेवा सुरू केली आहे. कारपूलिंग सुविधेत, अनेक लोक एकाच वाहनात एकत्र प्रवास करतात. किंबहुना एकाच ठिकाणी जावे लागणारे लोक एकत्र प्रवास करतात. या वैशिष्ट्यामुळे खासगी कार मालकांना त्यांच्या आवडीच्या सह-प्रवाशांसोबत राईड शेअर करता येणार आहे.