‘ओला’, ‘उबर’ला गोव्यात प्रवेश नाहीच
भाडेदरासह टॅक्सी व्यवसायावर नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार : टॅक्सी व्यवसाय अधिक पारदर्शक होणार
पणजी : टॅक्सी प्रश्न सोडवताना स्थानिक टॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि इतर सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. ओला, उबरला गोव्यात प्रवेश देणार नाहीच, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे. काल शुक्रवारी पर्वरी सचिवालयात आमदार मायकेल लोबो, जीत आरोलकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
सुलभतेसाठीच अॅप अॅग्रीगेटर
राज्यातील टॅक्सी व्यवसाय अधिक पारदर्शक आणि पर्यटकांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे. टॅक्सी भाडेदरांमध्ये समानता आणतानाच व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅप अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
ओला, उबरला प्रवेश नाहीच
अॅग्रीगेटरमुळे अन्य राज्यांमधील ओला, उबर यासारखे अॅग्रीगेटर गोव्यात येतील या विचाराने नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. ओला आणि उबरसारखे अॅग्रीगेटर गोव्यात येणार नाहीत. राज्यातील टॅक्सी प्रश्न सोडवताना स्थानिक टॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे, कोणत्याही निर्णयामुळे स्थानिक व्यवसायांना धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाडेदरात समानता आवश्यक
ओला, उबर किंवा अन्य राज्यांमधील अॅग्रीगेटरना राज्यात प्रवेश देणार नाही. तरीही टॅक्सी भाडे सर्व पर्यटक आणि अन्य नागरिकांना परवडण्यायोग्य असले पाहिजे. त्यासाठी भाडेदरात समानता आणणे आवश्यक असल्याने मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करताना आमदार आरोलकर यांनी अन्य राज्यांमधील अॅग्रीगेटरना आमचाही विरोधच असल्याचे सांगितले. आमदार मायकल लोबो यांनी त्यावेळी बोलताना, सरकारने सर्वांना विश्वास घेऊनच टॅक्सी भाडेदर निश्चित करावे, असे सांगितले.