ओला ‘गिग-एस1 झेड ई’ स्कूटर सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात दोन इलेक्ट्रिक स्कूटर गिग आणि एस1 झेड या गाड्या सादर केल्या आहेत. कंपनीने दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स दोन मॉडेलमध्ये सादर केल्या आहेत. यामध्ये ओला गिग, गिग पल्स, एस1 झेड आणि एस1झेड प्लस या मॉडेलचा समावेश असल्याची कंपनीची माहिती आहे. ओला गिगला स्थानिक पातळीवरील डिलिव्हरीच्या उद्देशाने डिझाईन केले आहे. तर एस1 झेडला खासगी आणि व्यावसायिक पातळीवर वापर होण्याच्या उद्देशाने तयार केले आहे.
दोन्ही ई स्कूटरमध्ये 1.5 केडब्ल्यूएचच्या रिमूव्हेबल बॅटऱ्या दिल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर्सची एक्स शोरुम किमत 39,999 रुपये आहे. ओला गिगची डिलिव्हरी एप्रिल 2025 आणि एस1 झेडची डिलिव्हरी मे 2025 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती आहे. भारतामध्ये ओला गिगची टक्कर कोमाकी एक्स 1 आणि एवन ई स्कूटर 504 यासारख्या स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरसोबत राहणार आहे. तसेच एस1 झेड युलु विन आणि जेलियो ईवा यांना टक्कर देणार आहे.
ओला गिग एक बेयरबोन इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यामध्ये कोणतेही पॅनल आणि इंफोटेनमेंट डिस्प्ले दिलेला नाही. याच्या पुढील बाजूला सिंगल एलइडी हेडलाइट आहे. ओला गिगला दोन मॉडेलमध्ये सादर करण्यात आले आहे. चार्जवर जवळपास 112 किमी गाडी धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.