ओला इलेक्ट्रीकने सेवा केंद्रांमध्ये केली वाढ
नवी दिल्ली :
इलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रात आघाडीवरच्या ओला इलेक्ट्रीकने आपल्या ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अखेर आपल्या सेवा केंद्रांच्या विस्तारावर भर देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. सेवा केंद्रांच्या संख्येत 30 टक्के इतकी वाढ केली असून विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत.
सॉफ्टबँकेचे पाठबळ लाभलेल्या कंपनीबाबत अलीकडच्या काही दिवसांमध्ये दुचाकीबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. याशिवाय संस्थापक भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल काम्रा यांच्यातील शाब्दिक चकमकीबाबतही सोशल मीडियावर बरंच काही घडलं होतं. याचदरम्यान सरकारनेही कंपनीचे ग्राहक तक्रारी बाबत कान टोचले होते. यानंतर कंपनीने गांभिर्य घेत नव्याने 50 सेवा केंद्रे स्थापन केली. याचबरोबर या क्षेत्रातील 500 पेक्षा अधिक सेवा तज्ञांचीही सेवा केंद्रांवर नियुक्ती केली आहे. सेवासंबंधीत तक्रारींचे निवारण केले जात असल्याचे कंपनीने म्हटले असून ग्राहकांचे समाधान करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जवळपास दोन तृतियांश इतक्या तक्रारींचे निवारण कंपनीने आतापर्यंत केले असल्याचे सांगण्यात येत आहे.