ओकाया भारतात 2550 वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या तयारीत
आयओसीसोबत भागीदारी : 125 कोटींची होणार गुंतवणूक
नवी दिल्ली :
ओकाया इव्ही चार्जेस यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी)यांच्यासोबत भागीदारी केली असून या भागीदारीअंतर्गत भारतातील विविध शहरांमध्ये 2550 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे उभारली जाणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रियेकरता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 125 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना देखील आखली आहे. ओकावा इव्ही चार्जेस यांची 20 राज्यांमध्ये मिळून जवळपास 362 केंद्रे कार्यरत आहेत. देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रति वाढता कल लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांकरता इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रांची उभारणी होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ओकाया कंपनीने हे पाऊल उचललेले आहे. 3.3 केडब्ल्यू आणि 7.4 केडब्ल्यू चार्जर त्याचप्रमाणे 30 केडब्ल्यू वॉल माउंटेड चार्जिंग सिस्टीम अशा विविध पर्यायांसह केंद्रे कार्यरत केली जाणार आहेत.