पड रे पावसा... जतची शेती झाली तहानलेला चातक !
सोन्याळ :
"पड रे पावसा... शेत माझं तुझ्या सरींसाठी आसुसलंय, तहानलंय, जणू चातक पक्ष्यासारखं... आज जत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हीच व्यथा धगधगत आहे.
जूनच्या सुरुवातीला आलेल्या एकदोन मध्यम ते हलक्या सरींनी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पेरण्यांचा धावपळीत दिवस-रात्र करीत शेतकऱ्यांनी बाजरी, मका, उडीद, मूग, तूर अशा खरिपातील पिकांची पेरणी केली. जतच्या बहुतांश भागात पीके बऱ्यापैकी उगवूनही आली. पण पावसाने पुन्हा पाठ फिरवली आणि आभाळही कोरडं झालं.
खरिपाची स्वप्नं पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळावर खिळलेत. काहींनी विहिरी आणि बोअरिंगचा आधार घेतलाय. पण अधिक काळ असं करणं शक्य नाही. तालुक्यात वीजेचा लपंडाव, खतांचा तुटवडा आणि बाजारभावाची अनिश्चितता या झळा सोसत शेती पिकवणं म्हणजे जीवघेणं आव्हानच बनलं आहे.
जत तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पेरलेली बियाणं उगवलीच नाहीत. काही ठिकाणी उगवल्यानंतर पावसाअभावी पिकं सुकू लागली. पेरण्या वाया गेल्या म्हणून काहींनी दुबार पेरणी केली. पण पुन्हा पावसाने दगा दिला. परिणामी, अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासकीय योजनांची प्रतीक्षा करत, कर्जबाजारीपणाला सामोरे जात, तरीही आजही जतचा शेतकरी म्हणतो, "पड रे पावसा ... नाहीतर शेत माझं तडफडून मरेल!"
शेती ही नुसती जमीन नाही, ती हाडामांसाच्या माणसांची आशा आहे. पावसाचं थेंब म्हणजे त्यांच्या स्वप्नांचा शिडकावा. म्हणूनच जत तालुक्यातील शेतकरी आजही निःश्वास टाकत आभाळाकडे पाहत आहेत... चातकासारखे !