For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवा पहा, पहा. हे सगळे माझे भाऊबंद व गुरु आहेत

06:04 AM Sep 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
देवा पहा  पहा  हे सगळे माझे  भाऊबंद व गुरु आहेत
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

युद्धाचे वर्णन करताना संजय म्हणाला, युद्धाला सुरवात करण्याआधी पांडवांच्याकडून सर्वप्रथम श्रीकृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला.

नंतर युधिष्ठीर, नकुल, सहदेव, काशिराज, शिखंडी, धृष्टधुम्न, विराट, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महाबाहु अभिमन्यु इत्यादिकांनी आपापले शंख वाजवले. पृथ्वी व आकाशही दणाणून सोडणाऱ्या त्या शंखाचा तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण झाली. ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती. त्यामुळे कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. त्यांच्यातील नायकांनी सावरल्यावर कौरवपक्षीय सैनिक पुन्हा व्यवस्थित उभे राहिले.

Advertisement

आता युद्धाला सुरवात होणार एव्हढ्यात अर्जुन पुढील श्लोकात म्हणतो, कृष्णा माझ्या विनंतीनुसार दोन्ही सैन्यामध्ये माझा रथ उभा केलास की, मी युद्धासाठी तयार असलेल्या योद्ध्यांचे अवलोकन करीन व या रणसंग्रामामध्ये मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे ते मी पाहून घेईन. दुर्योधनाचे प्रिय करण्याची इच्छा असलेले योद्धे मला पहायचे आहेत.

म्हणजे कोण पाहीन राखिती युद्धकामना । आज ह्या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज ।। 22 ।। झुंजते वीर ते सारे घेतो पाहुनी येथ मी । युद्धी त्या हत-बुद्धींचे जे करू पाहती प्रिय ।। 23 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने कृष्णाला अशी विनंती केली की, अशा ठिकाणी माझा रथ उभा कर की, जेथून मी झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक पुरते न्याहाळून पाहीन. मी रणात कोणाबरोबर लढायचे आहे तेही समजेल. हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हाव धरतात. ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत.

संजय धृतराष्ट्राला पुढील श्लोकात म्हणाला, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो उत्तम रथ आणून उभा केला.

अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकुनि शीघ्रचि । दोन्ही सैन्यामध्ये केला उभा उत्तम तो रथ ।। 24 ।। मग लक्षूनिया नीट भीष्म द्रोण नृपास तो । म्हणे हे जमले पारथा पहा कौरव सर्व तू  ।।25 ।। तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित । आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे  ।गुरुबंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे ।। 26 ।। असे पाहुनि तो सारे सज्ज बांधव आपुले । अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला ।। 27।।

श्लोकांच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने राजाला असे सांगितले की, अर्जुनाच्या सांगण्यानुसार श्रीकृष्णाने रथ हाकला व दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. नंतर भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्याकडे अर्जुनाचे लक्ष वेधून तो म्हणाला, हे पार्था, जमलेल्या या कौरवांना पहा. त्यामध्ये असा उद्देश होता की, हेच ते कौरव ज्यांनी तुमचा वारंवार अपमान केला आहे. अर्जुनाने आजे, गुरु, मामा, बंधु, पुत्र, नातु, तसेच जिवलग मित्र, सासरे, स्नेही असे दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले पाहिले. तेथे जमलेले आपले बांधवच आहेत असे पाहून तो कुंतिपुत्र म्हणाला, देवा पहा, पहा. हे सगळे माझे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. तो आपल्या मनाशीच म्हणाला, ह्याने हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊक? पण काहीतरी विलक्षणच आहे. तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. गुरु, नातेवाईक आणि मित्र ह्यांना पाहून अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यांच्याबद्दल उत्पन्न झालेल्या करुणेमुळे अर्जुनाच्या अंगातल्या वीरवृत्तीचा अपमान झाल्याने ती निघून गेली.

क्रमश:

Advertisement
Tags :

.