लेखा स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी
खासगी सकिंग मशीनचालकांना बजावणार नोटीस : मनपाच्या जागा ताब्यात घेण्याची सूचना
बेळगाव : महापालिकेच्या लेखा स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष व सदस्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढण्यात आली. विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळत नाहीत. संबंधित फाईल बैठकीला आणली जात नाही. कोणतेही काम हाती घेताना किंवा बिलाला मंजुरी देताना महापौर व लेखा स्थायी समितीला विश्वासात घेतले जात नाही. यापुढे महापौर, उपमहापौर व सदस्यांना माहिती देऊनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी सक्त सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात लेखा स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मानंद मिरजकर होते. तर व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, सदस्य रवी धोत्रे, शिवाजी मंडोळकर यांच्यासह इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. महापालिकेच्या दोन शववाहिन्या आहेत. मात्र, त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या सुपरवायझरकडून लोकांना व्यवस्थित प्रतिसाद दिला जात नाही.
त्यामुळे सुपरवायझरला कार्यालयीन वेळेत व्यवस्थितरित्या काम करण्याची सूचना करण्यात यावी. चांगली वर्तणूक असलेल्या चालकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर शववाहिन्यांसंदर्भात माहिती देण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी दररोज 6 ते 7 मृतदेह स्मशानभूमीकडे नेले जातात. एक मृतदेह वाहून नेण्यासाठी 15 रुपये आकारले जातात. पुढील महिन्यात दोन अतिरिक्त नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत. त्याचबरोबर दोन्ही वाहनांना दोन दिवसांसाठी 40 लिटर डिझेल दिले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या दोन सकिंग मशीन असून त्यांच्या माध्यमातून महिन्याला केवळ 9 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांच्या पगारापोटी दर महिन्याला 9 लाख रुपये खर्च केले जातात. तर वर्षासाठी 1 कोटी 8 लाख रुपये केवळ अधिकाऱ्यांच्या पगारावर खर्च केला जातो. पण सकिंग मशीनच्या माध्यमातून महिन्याला केवळ 9 हजार रुपये महापालिकेला मिळत आहेत.
खासगी सकिंग मशीन चालविणाऱ्यांवर कारवाई
महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून सकिंग मशीन पाठविण्याची विनंती केल्यास महापालिकेची सकिंग मशीन पाठविण्याऐवजी खासगी मशीन पाठविली जाते. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. हेल्पलाईनमधून खासगी सकिंग मशीनना संपर्क साधला जातो. त्यामुळे महापालिकेकडून कायदेशीर परवानगी न घेता खासगी सकिंग मशीन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
महापालिकेच्या जागा ताब्यात घ्या
शहर व उपनगरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. सदर जागांवर शाळा व इतर व्यापारी आस्थापने चालविणाऱ्यांची मुदत संपली असली तरीही त्या जागा पुन्हा ताब्यात घेण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या जागांचा वाद न्यायप्रविष्ट आहे, त्या वगळून उर्वरित मुदत संपलेल्या मिळकती पुन्हा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आली.
तातडीने कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा पगार करा
महापालिकेत 36 कॉम्प्युटर ऑपरेटर्सच्या जागा मंजूर असताना 40 जणांना भरती करून घेण्यात आले आहे. याबद्दलही बैठकीत जोरदार चर्चा झाली. ई-आस्थी नोंदणीसाठी कंत्राटी पद्धतीवर तीन महिन्यांसाठी घेतलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा पगार करण्याची सूचना यापूर्वीच लेखा स्थायी समितीकडून करण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप देण्यात आला नसल्याने महापालिकेसह नगरसेवकांची बदनामी होत आहे. त्यामुळे तातडीने कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा पगार करण्यात यावा, असे यावेळी सांगण्यात आले.