परप्पन कारागृहावर अधिकाऱ्यांचा छापा
कैद्यांना पुन्हा दिलेल्या शाही बडदास्तच्या व्हायरल व्हिडिओवरून कारवाई : कारागृह कर्मचाऱ्यांसह 100 हून अधिक बॅरेकची केली तपासणी
बेंगळूर : नराधम उमेश रेड्डी, सोने तस्करी प्रकरणातील आरोपी तरुण राज याच्यासह लष्कर-ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्यांना अॅन्ड्रॉईड मोबाईल, टीव्ही व इतर सुविधा पुरविण्यात येत असल्याचे उघडकीस येताच परप्पन अग्रहार कारागृहातील बॅरेकच्या कारागृह अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला आणि 100 हून अधिक बॅरेकची तपासणी केली. दरम्यान, कारवाईवेळी मोबाईल फोनसह कोणत्याही वस्तू आढळून आलेल्या नाहीत. तसेच अधिकाऱ्यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
उमेश रेड्डी मोबाईल फोन वापरून टीव्ही पाहत असल्याचे आणि लष्कर-ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्याचे मोबाईल फोन वापरून व्हायरल झालेल्या व्हिडिओचा गांभीर्याने दखल घेण्यात आला आहे. दरम्यान, तपासणी केली असता हे व्हिडिओ 2023 मध्ये केले गेले असल्याचे आढळून आले. कारागृहातील काही कर्मचाऱ्यांकडूनच कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डीआयजी आनंद रेड्डी आणि कारागृह अधिकाऱ्यांकडून एडीजीपी दयानंद यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मोबाईल फोनचा वापर आणि व्हायरल व्हिडिओची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परप्पन अग्रहार कारागृहात राउडी शीटर गुब्बच्ची सीनाचा वाढदिवस साजरा करण्याच्या मुद्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. चौकशीखाली असलेल्या कैद्यांना एलईडी टीव्ही सुविधा देण्यासह स्वयंपाक करण्यासाठी स्टोव्ह, भांडी आणि साहित्य मिळत आहेत. त्यांना अंडी, चिकन, मोबाईल, चार्जर आणि पार्टी करण्यासाठी साउंड सिस्टिम यासारख्या आलिशान सुविधा दिल्या जात असल्याचा फोटो व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर, कारागृहात कैद्यांना शाही बडदास्त दिल्याबद्दल आक्रोश व्यक्त झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच परप्पन अग्रहार कारागृहात आयसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जुहाद हमीद शकील मन्ना यालाही शाही आतिथ्य मिळत असल्याचे आढळून आले आहे. कारागृहात तो राजेशाही पद्धतीने फोन वापरताना दिसला आहे.
संबंधितांवर कठोर कारवाई : गृहमंत्री
नराधम उमेश रेड्डी मोबाईलचा वापर करून टीव्ही पाहत आहे. लष्कर-ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्याने मोबाईलचा वापर केल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आणखी एक व्हिडिओ व्हायरल
परप्पन अग्रहार कारागृहातील कैद्यांचे राजेशाही आदरातिथ्य व्हिडिओंद्वारे उघड होत आहे. रविवारी मांसाहारी, दारू पिऊन डान्स करतानाचा कैद्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परप्पन अग्रहार कारागृहात दारू पिऊन कैद्यांचा बेफाम नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील दृश्यांमध्ये कैदी ढोल आणि प्लेट्स वाजवून दारू पिऊन नाचताना दिसत आहेत. कारागृहातील व्हायरल व्हिडिओची पोलीस चौकशी करत आहेत. तो व्हिडिओ परप्पन अग्रहारा कारागृहातील आहे की दुसऱ्या कारागृहातील आहे याचा तपास सुरू आहे.