मराठी नोटिसीवरून अधिकारी धारेवर
नगरसेवक रवी साळुंखे यांनी सर्वसाधारण सभेत उठविला आवाज
बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस केवळ कन्नड भाषेत देण्यात आल्याने म. ए. समितीच्या नगरसेवकांनी गुऊवारी बैठकीच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. याला आमदार राजू सेठ यांच्यासह सत्ताधारी गटनेते व बहुतांश नगरसेवकांनी पाठिंबा देत मराठी भाषेत अनुवाद केलेली प्रत देण्यास काय अडचण आहे? अशी विचारणा केली. कार्यालयीन कामकाज केवळ कन्नड भाषेतून करण्याचा सरकारचा आदेश आहे. तसेच आपल्याकडे अनुवादकही नाही, अशी माहिती कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार यांनी सभागृहाला दिली. महानगरपालिकेच्या 5 डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेची नोटीस सर्व नगरसेवकांना देण्यात आली होती. यापूर्वी कन्नडबरोबरच मराठी भाषेतही बैठकीची नोटीस देण्यात येत होती. मात्र गेल्या काही बैठकांच्या नोटिसा केवळ कन्नड भाषेत दिल्या जात आहेत. त्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांना कन्नड भाषेतील नोटिसा समजणे कठीण जात आहे. आपल्या भाषेत नोटिसा देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांकडून सातत्याने केली जात आहे.
मात्र मागणीकडे दुर्लक्ष करत केवळ कन्नडमधून नोटीस देण्यात आल्याने म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह समितीच्या इतर नगरसेवकांनी बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला. सभेला सुरुवात होताच नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे मराठी नोटिसीबाबत विचारणा केली. नोटिसीच्या मुद्द्यावरून प्रत्येक बैठकीत गदारोळ निर्माण होत आहे. त्यामुळे कन्नड भाषेतील नोटिसीची अनुवाद केलेली प्रत देण्यास काय अडचण आहे? या विषयावरून सभागृहाचा वेळ वाया घालविण्यापेक्षा कन्नड, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषांतून नोटिसा नगरसेवकांना देण्यात याव्यात, अशी विनंती विरोधी, सत्ताधारी गटनेत्यांसह नगरसेवकांनी केली. त्यानंतर महापौर सविता कांबळे यांनी कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार यांना याबाबत खुलासा करण्याबाबत सूचना केली. सरकारच्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाज केवळ कन्नड भाषेतून केले पाहिजे, असा सरकारचा आदेश आहे. त्यामुळे कन्नड भाषेतून नोटीस दिली जात असल्याचे सांगितले. त्यावर कन्नड भाषेतील अनुवाद केलेली प्रत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मराठी अनुवादक नाही
कौन्सिल सेक्रेटरी तळवार म्हणाले, आम्ही कन्नड आणि इंग्रजी भाषेतील नोटीस देत आहोत. पण आपल्याकडे मराठी अनुवादक नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. अनुवादकाच्या नियुक्तीला परवानगी मिळावी यासाठी अकाऊंट्स विभागाकडे फाईल पाठविण्यात आली आहे. मात्र हे पद मंजूर नसल्याने नियुक्ती केल्यास संबंधितांना वेतन मिळणार नसल्याचे सांगितल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. तसेच अनुवादकही मिळत नसल्याचे सांगितल्यानंतर नगरसेवकांनी कौन्सिल सेक्रेटरी तळवार यांना धारेवर धरले. गेल्या दीड वर्षापासून अनुवादक मिळत नाही का? असा सवालही उपस्थित केला. सर्व 58 नगरसेवकांना मराठी भाषेतून नोटीस देण्यात यावी, अशी मागणी केली. मराठीच्या मुद्द्यावरून वारंवार वेळ वाया जात असल्याने विकासावर चर्चा करा, असे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी म्हटले. त्यावर नगरसेवक रवी साळुंखे यांनी आपण विकासाला विरोध करत नाही. पण आपल्या भाषेतून आम्हाला नोटीस मिळावी ही आपली आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेकडून कन्नड, इंग्रजी, हिंदी, मराठी या सर्व भाषांतून नोटीस देण्यात येते. सभागृहात उर्दू भाषिक 14 नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्हालाही उर्दू भाषेतून नोटीस देण्यात यावी, अशी मागणी विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांनी केली. आजच्या सर्वसाधारण सभेला आयुक्त शुभा बी. अनुपस्थित होत्या. तर उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार राजू सेठ, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.