कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मटका बंदची बुकीपेक्षा कारभाऱ्यांनाच धास्ती

12:31 PM Jun 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील :

Advertisement

नवीन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिह्यात मटका, अवैध धंदा बंद म्हणजे बंद, असे फर्मान सोडले आहे. कोणताही नवीन एसपींनी पदभार स्विकारला की, अशी लोकप्रिय घोषणा होतेच होते. हफ्ता वाढवण्याची ती जगजाहीर असलेली क्लुप्ती सर्वमान्य आहे. मात्र, योगेशकुमार गुप्ता यांनी ठामपणे आदेश दिल्याने मटका बुकींना तर घाम फुटला आहेच, त्यापेक्षा आता पगारात भागवावे लागणार असल्याने वसुलीच्या कामात असलेले कारभारी पोलीस बेचैन झाले आहेत. मात्र, मटका बंद खरंच की हबकी डाव? यावर लवकरच पडदा पडेल.

Advertisement

मटका, अवैध व्यवसायाकडे कानाडोळा करण्याचा मोबदला पोलिसांना मिळत आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला तर दर काही दिवसांनी किलोमध्ये गांजा आणि अंमली नशेचे पदार्थ सापडत होते. मात्र, त्याच यंत्रणेला कोपऱ्या, कोपऱ्यावर टपऱ्यांतून फिरत्या व्हॅनमधून, सीबीएसपासून अनेक गर्दीच्या ठिकाणी, महाविद्यालयांच्या परिसरात विकला जाणारा गांजा कधीच नजरेत पडला नाही. तसेच गल्ली-बोळात मटका जोमाने आणि यंत्रणेच्या कानावर टिच्चून सुरू होता. सर्वसामान्यांना मटक्याच्या चिठ्ठ्या दिसत होत्या. यंत्रणा मात्र मटक्यातून मिळणाऱ्या आकडेमोडीत व्यस्त होती.

तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि शैलेश बलकवडे यांनी पाच वर्षात मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने मटका बंद केला होता. आजच्या घडीला आपल्या ठाण्याच्या हद्दीतील मटका अवैध व्यवसाय, गांजा विक्री बंद व्हावी, अशी इच्छा असणारे किती पोलीस अधिकारी आहेत?

या पार्श्वभूमीवर नूतन एसपी योगेशकुमार गुप्ता यांनी मटका आणि अवैध व्यवसाय बंद करण्यासह गांजा विक्रीवर लगाम घालण्याचे आदेश दिले आहेत. असे आदेश नवीन येणारे प्रत्येक एसपी देतातच. त्यामुळे हे आदेशच आहेत की हबकी डाव? याचा अंदाज यंत्रणा घेत आहे. आणि खरंच नव्या साहेबांनी देशमुख आणि बलकवडे यांच्याप्रमाणे मटका बंद केलाच तर दानापाणी बंद होण्याची धास्तीही अनेकांना सतावत आहे. कोल्हापुरात वरकमाईतून खिसा गरम होत असल्याने अनेकांनी मोल देऊन पोस्टींग घेतले आहे. त्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अदाबाकी केली आहे. काहींची वसुली झाली आहे तर काहींची अपुरी आहे. आता नव्या साहेबांनी खरंच मनावर घेऊन मटक्यासह खिसा गरम करणारे व्यावसाय बंद केले तर पगारात भागवावे लागणार, याची धास्ती सतावत आहे.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे अत्यंत प्रामाणिक आणि सरळमार्गी अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत. त्रागा करुन आदळआपट न करता स्मितभाषी राहून शांतपणे काम करण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या शांत स्वभावाचा येथील यंत्रणा फायदा उठवू शकते. अधीक्षक कार्यालयात खबरीलाल म्हणून काही कुप्रसिध्द आहेत. वरिष्ठांना हालचाली कळवून आपली पोळी भाजून घेण्यात ही कुजबुज गँग प्रसिध्द आहे. कानाला लागणाऱ्यांना आता काम करावे लागेल, अशी आशा आहे. तोऱ्यात वावरणाऱ्या 2
‘एलसीबी’ला खरेखुरे डिटेक्शन करावे लागेल. आतापर्यंत कानाडोळा केलेल्या मटका बुकी आणि गांजा विक्रीची ठिकाणेही पोलीस ठाण्यासह ‘एलसीबी’ला दिसतील, अशी आशा योगेश कुमार गुप्ता यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून करण्यास हरकत नाही. लवकरच हबकी की आदेश, हेही स्पष्ट होईलच.

मटका आणि अवैध व्यावसायाला पायबंद घालताना यापूर्वी तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि शैलेश बलकवडे यांनी काळेधंदे आढळले की संबंधित अतिरिक्तसह डीवायएसपी, निरीक्षकापासून बीट अंमलदारापर्यंत कारवाईचे निर्देश दिले. अनेकवेळा कारवाईही केली. परिणामी, एसपीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी झाली. अशीच वरुन खालीपर्यंत कारवाई केली तरच फोफावलेली यंत्रणा सरळ होईल.

उपनगरातील एका रिक्षाचालकाने दोन वर्षात मटका बुकी सुरू केली. आता हाच रिक्षाचालक अनेक फ्लॅट, बंगले, चारचाकी वाहनांचा ताफा बाळगून आहे. हे सगळे यंत्रणेच्या कृपादृष्टीशिवाय झालेले नाही. आता असे नवश्रीमंत बुकीवाले शोधून कारवाई करण्याचे धारीष्ठ्या यंत्रणेला करावे लागणार आहे.

दर महिन्याच्या दहा तारखेला म्हणे इथले कलेक्शन असते. आकडेमोडीची ही तारीख आहे. मटका-जुगार, अवैध व्यवसाय, गांजा यातून कमाई सुरू राहणार की बंद होणार, याबाबत दहा तारखेनंतरच चित्र स्पष्ट होईल. नवीन साहेबांनी बंद म्हणजे बंदचा आदेश दिला तरी काही ठाण्यांच्या हद्दीत मुर्दाडपणे तो सुरू राहू शकतो, हा मागील अनुभव आहे. येत्या काळात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका, गणेशोत्सव, संभाव्य महापूर तयारी आदीमुळे अवैध धंदे बंद खरेच बंद झाले का? यावर लक्ष ठेवण्याचे आव्हान असेल.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article