अधिकाऱ्यांनी बजावल्या ठेकेदारांना नोटीस
कोल्हापूर :
रस्ते कामात गुणवत्ता आढळली नाही तर कारवाई करू, अशी नोटीस महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी थेट चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभिंयता आणि कनिष्ट अभिंयत्यांना शुक्रवारी बजावली होती. यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी थेट कंत्राटदारांना शनिवारी नोटीस बजावत रस्त्याच्या कामांची गुणवत्ता सुधारा अन्यथा कारवाई करु, अशी नोटीस बजावली आहे.
कोल्हापूर महापालिकेस राज्यशासनाकडून नगरोत्थान योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शहरातील 16 रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याने हा विषय चर्चेच बनला आहे. महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी जागेवर जाऊन रस्ते कामाची पाहणी केली. यामध्ये रस्ते दर्जदार नसल्याचे आढळल्याने त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ठेकेदारासह शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, तत्कालिन शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह एका कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना दंड केला होता. यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी सायंकाळी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभिंयता, कनिष्ट अभिंयता यांना नोटीस बजावल्या होत्या. यानंतर खडबडून जागे झालेल्या चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठेकेदारांना नोटीस बजाविल्या आहेत.
जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावत विभागीय कार्यालयांतर्गत हे रस्ते होत असताना त्यांचीही रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. परंतू त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे नोटीसीमध्ये नमूद केले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकत थेट कंत्राटदारांनाच नोटीस पाठविली आहे.