मासिक पाळीच्या रजेबाबत अधिकृत आदेश
अर्थखात्याच्या सचिवांकडून आदेशपत्रक जारी
बेंगळूर : राज्यातील सर्व उद्योग व संस्थांमध्ये काम करणाऱ्या 18 ते 52 वयोगटातील सर्व कायमस्वरूपी,कंत्राटी आणि बाह्याकंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात दरमहा एक दिवस याप्रमाणे वर्षाला 12 दिवस पगारी रजा देण्याची सुविधा देणारा अधिकृत आदेश सरकारने जारी केला आहे. अर्थखात्याच्या सचिवांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे.महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल सुधारण्याच्या उद्देशाने हा आदेश जारी केला आहे.
राज्यात विविध कामगार कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व उद्योग आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या 18 ते 52 वयोगटातील सर्व कायमस्वरूपी/कंत्राटी/बाह्याकंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात दरमहा एक दिवस पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता या संदर्भात अधिकृत आदेशपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्यातील महिला सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवस मासिक पाळीच्या रजेची सुविधा तात्काळ लागू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 18 ते 52 वयोगटातील महिला सरकारी कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकते. प्रासंगिक रजा मंजूर करण्यास सक्षम अधिकारी ही रजा देऊ शकतात. ही रजा घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ही रजा हजेरीनोंद पुस्तकात स्वतंत्रपणे नोंदवली जाईल. मासिक पाळीची रजा इतर कोणत्याही रजेत संलग्न केली जाऊ शकत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.