पदपथांवरील अतिक्रमण हटाव पथकात तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश
बेळगाव : शहर व उपनगरातील पदपथांवर जिकडे तिकडे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत तक्रार करूनदेखील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे याला नेमके जबाबदार कोण? अशी विचारणा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. महसूल, सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण या तिन्ही विभागांनी एकत्रितरित्या ही कारवाई करावी व याचे नेतृत्व अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर करतील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मंगळवारी महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवक नितीन जाधव, गिरीश धोंगडी यांनी पदपथांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा विषय उचलून धरला. जिकडे तिकडे पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. पण संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करणे गरजेचे असताना भू-भाडे वसूल करणाऱ्या ठेकेदाराकडून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहेत. महानगरपलिकेला भू -भाडे भरूनदेखील आमच्यावर कारवाई का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अतिक्रमण केलेल्या कारवाईबाबतची मागणी अधिकाऱ्यांकडे केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. सदर जबाबदारी आपल्याकडे येत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी व महापौरांनी तिन्ही विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाची स्थापना करावी, अशी मागणी केली. त्यानुसार यापुढे पदपथांवरील अतिक्रमण संदर्भात काही तक्रारी असल्यास त्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे कराव्यात, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. एखाद्या ठिकाणी विक्रेत्यांवर किंवा व्यावसायिकांवर कारवाई करायची असल्यास त्याची पूर्वकल्पना संबंधितांवर देण्यात यावी, अचानकरित्या कारवाई केली जात असल्याने त्याचा फटका फेरीवाल्यांना बसत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीदेखील नगरसेवकांनी बैठकीत केली.