अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : अधिवेशनासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : सोमवार 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. मागील अधिवेशन कोणत्याही समस्यांविना यशस्वीरित्या पार पडले. यंदाचे अधिवेशनही कोणत्याही त्रुटींशिवाय यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे. अधिवेशनासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. ज्या अधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिली आहे, ती त्यांनी योग्यरित्या पार पाडावी. कोणत्याही चुका आढळून आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिला.
जि. पं. सभागृहात अधिवेशनासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसौधमधील खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. तेथे त्यांना कोणत्याही साहित्याची कमतरता भासू नये, याची काळजी घ्यावी. संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित विभाग व मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची माहिती घ्यावी. तसेच त्यांची योग्य व्यवस्था करण्याचीही काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. संपर्क अधिकाऱ्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी डोंगलची व्यवस्था बंधनकारकर करण्यात आली आहे.
संपर्क अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत विचारल्यास त्यांना त्याची व्यवस्था करून द्यावी. तसेच त्यांच्या कक्षातील संगणक व प्रिंटर योग्यरित्या कार्यरत आहेत की नाही याची आगाऊ खात्री करून घ्यावी. काही त्रुटी आढळल्यास समन्वयातून त्वरित समस्या निकाली काढाव्यात. सत्र कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या फोनकॉलला प्रतिसाद द्यावा. काही समस्या असल्यास संबंधितांनी जि. पं. उपसचिव व योजना संचालकांना संपर्क साधावा. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले काम पूर्ण निष्ठेने पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपसचिव बसवराज हेग्गनायक, बसवराज अडवीमठ, मुख्य लेखापाल परशुराम दुडगुंडी, योजना संचालक रवी बंगारप्पन्नवर, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, साहाय्यक सचिव राहुल कांबळे, कार्यालय व्यवस्थापक बसवराज मुरघामठ यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.