For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सकिंग मशीनबाबत अधिकारी धारेवर

09:20 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सकिंग मशीनबाबत अधिकारी धारेवर
Advertisement

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा : मनपाऐवजी खासगी सकिंग मशीन दिल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेकडे बेळगाव उत्तर व दक्षिणसाठी स्वतंत्र सकिंग मशीन आहे. परंतु महापालिकेत सकिंग मशीनच्या चौकशीसाठी फोन केल्यानंतर खासगी सकिंग मशीन चालक त्याठिकाणी पोहोचतात. यामुळे शहरातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अधिकाऱ्यांनाही समर्पक उत्तरे देण्यात आली नसल्याने मनपाच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे पदाधिकारी चांगलेच संतापले.

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी पार पडली. समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये शहरातील विकासात्मक बाबींवर चर्चा झाली. पथदीप, सकिंग मशीन, स्मशानभूमींची स्वच्छता यासह इतर मुद्यांवर चर्चा झाली. सकिंग मशीनबाबत चर्चा करताना अधिकारी म्हणाले, खासगी सकिंग मशीनपेक्षा मनपाच्या सकिंग मशीनला भाडे कमी असल्यामुळे मागणी अधिक आहे. मागणी अधिक आहे तसेच नफाही होतोय, मग मशीन वारंवार बंद का ठेवली जाते? असा प्रश्न विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले.

Advertisement

मनपाच्या सकिंग मशीनचा दर 2000 रुपयांवरून आता 2500 रु. करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर महापालिका हद्दीत गटारी, नाले, अथवा चेंबरमध्ये खासगी सकिंग मशीन चालकांनी मैला सोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच नाला सफाई करण्यासाठी जेसीबीची त्वरित दुरुस्ती करण्याचीही चर्चा झाली. शहराच्या काही भागात पथदीप तसेच ट्रान्स्फॉर्मर बसविण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवून त्याठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, बाधकाम स्थायी समितीचे सदस्य संतोष पेडणेकर, उदयकुमार उपरी, बसवराज मोदगेकर, शिवाजी मंडोळकर, सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी, विरोधी गटाचे गटनेते मुजम्मिल डोणी, सांबरेकर यांच्यासह मनपाच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर, कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी, कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार, इलेक्ट्रिक विभागाचे अभियंता आनंद देशपांडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

स्मशानभूमींचा होणार विकास

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील स्मशानभूमींच्या दुरावस्थेबाबत जोरदार चर्चा झाली. शहापूर स्मशानभूमीतील शेडचे पत्रे पूर्णपणे निकामी झाले असून ते त्वरित बदलण्याची सूचना करण्यात आली. यावेळी शहरातील सदाशिवनगर, अनगोळ, जुने बेळगाव, वडगाव यासह लिंगायत व मुस्लीम स्मशानभूमींच्या विकासावर आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली. लवकरच हा आराखडा तयार करण्यात येणार असून स्मशानभूमींचा विकास होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.