गिरी अपघातात अधिकारी ठार
मयत कोलवाळ येथील नारायण केशव अभ्यंकर : कायदा खात्याचे अवर सचिव म्हणून होते सेवेत
म्हापसा : राष्ट्रीय महामार्गावर गिरी येथे उड्डाणपुलाजवळ काल मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कायदा खात्याचे अवर सचिव नारायण केशव अभ्यंकर (51) रा. कोलवाळ रामनगर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की बसचे चाक डोक्यावरून गेले होते. त्यामुळे रस्ता रक्ताने माखल होता. घटनेची माहिती म्हापसा अग्निशामक दल व पोलिसांना दिल्यावर निरीक्षक निखिल पालेकर यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह त्वरित आझिलो इस्पितळात नेण्यात आला असता ड्युटीवरील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसौझा यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गिरी ग्रीनपार्क नजिक, महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. अभ्यंकर हे आपल्या दुचाकी गाडी क्र. जीए 03 -एएस 8836 ने पर्वरी सचिवालयात जात असताना खाजगी बस क्र. जीए07-एफ-5679 ने धडक दिल्यावर अभ्यंकर हे खाली कोसळले व मागच्या चाकाखाली सापडले. बसने त्यांना सुमारे पंधरा मीटर लांब फरफटत नेले होते.
नागरिकांकडून बसचालकास चोप
बसचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी त्याला पकडून येथेच्छ चोप दिला व नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जीए 07 एफ - 5679 ही ‘बाबा सुमेध’ नावाची बस पोलिसांनी जप्त केली आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी बसचालक प्रेमानंद तानाजी (मूळ पेडणे येथील, सध्या राहणारा म्हापसा येथे) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.