मासेमारी खात्याच्या साहाय्यक संचालक कार्यालयाचे अन्यत्र स्थलांतर करू नये
कारवार जिल्हाधिकाऱ्यांना विविध मच्छीमारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन
कारवार : येथून जवळच्या अल्लिगद्दा समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या मासेमारी खात्याच्या साहाय्यक संचालकांच्या कार्यालयाचे अन्यत्र स्थलांतर करू नये, अशी मागणी विविध मच्छीमारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बांधवांनी कारवार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. सोमवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया एस. यांची भेट घेवून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी मच्छीमारी खात्याशी संबंधीत असलेली अनेक कार्यालये येथील समुद्र किनाऱ्यांजवळ होती. ही कार्यालये वेगवेगळ्या कारणांमुळे अन्यत्र स्थलांतरीत केली आहेत. ही कार्यालये समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या हब्बुवाडा येथे स्थलांतरीत केली आहेत. असे केल्याने मच्छीमारी बांधवांना जॉईंट डायरेक्टर किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना जाणे कठीण झाले आहे. कारवारसह अन्य प्रदेशातील मच्छीमारी बांधव आपल्या समस्या मांडण्यासाठी किंवा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अलीगद्दा समुद्र किनाऱ्याजवळच्या सहाय्यक संचालकांच्या कार्यालयाला येत होते. हे कार्यालय अतिशय सोयीचे होते. तथापि, मासेमारी खात्याची वेगवेगळी कार्यालये हब्बुवाडा येथे हलविल्याने मच्छीमारी बांधवांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.
हे कार्यालय अलिकडेच येथून हब्बुवाडा येथे का हलविण्यात येत आहे, असे विचारले असता कार्यालयाच्या इमारतीची गळती सुरू आहे, असे सांगण्यात आले. एकदा इमारतीला गळती लागली तर त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती करायची सोडून अन्यत्र स्थलांतर करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करून निवेदनात पुढे म्हटले आहे की, कार्यालय अन्यत्र स्थलांतर करण्याच्या निर्णयाचा मच्छीमारी बांधव निषेध करीत आहोत. कार्यालय अन्यत्र स्थलांतर करून मासेमारी बांधवांच्या अडचणीत भर टाकू नये. त्याकरिता कार्यालय अन्यत्र स्थलांतराचा निर्णय मागे घ्यावा व कार्यालय अल्लिगद्दा येथेच कार्यरत ठेवावे. अन्यथा मच्छीमारी बांधव रस्त्यावर उतरुन प्रशासनाचा हा निर्णय हाणून पाडतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला. यावेळी नगरसेवक राजेश माजाळीकर, प्रकाश हरीकंत्र, चेतन हरीकंत्र, सदाशिवगड ग्रा. पं.सदस्य सुभाष दुरॉकर, देवराय सैल, श्रीपाद खोबरेकर, सुनील हरीकंत्र आदी उपस्थित होते.