सौंदत्ती यल्लम्मा देवीला 16 टन तेल अर्पण
वार्ताहर/बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर नवरात्रोत्सव काळात मंदिरात 16 हजार 200 किलो तेल जमा झाले आहे. नवरात्रोत्सव काळात डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या गर्भगृहासमोर देवीला तेल अर्पण करण्यासाठी दिवा ठेवला जातो. भाविक प्रथमत: दिव्यात तेल ओतूनच देवीचे दर्शन व इतर पूजाविधी करतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेलाचा साठा कमी होण्याची शक्यता होती. गतवर्षी नवरात्रीमध्ये 14 हजार 194 किलो तेल जमा झाले होते. त्या तेलाची 51 रुपये किलो दराने विक्री केल्याने मंदिर प्रशासनाला सात लाख 23 हजार 894 रुपये महसूल मिळाला होता. यावेळी ऑक्टोबर 3 ते 12 पर्यंत 16 हजार 200 किलो तेल जमा झाले. हे तेल निविदाकारांना प्रतिकिलो 58 रुपये किलो दराने विक्री होणार असून मंदिर प्रशासनाला 9 लाख 39 हजार 600 रुपये महसूल मिळणार आहे. यंदा तेलाच्या दरात वाढ होऊनही भाविकांनी दिव्यात तेल अर्पण केले आहे. यावेळी शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. यंदा पावसाचा हंगाम चांगला झाल्याने तेलाचा भरणा अधिक झाल्याचे यल्लम्मा मंदिराचे सीईओ एसपीबी महेश यांनी सांगितले.