मधमाशांच्या पोळ्याखाली राहण्याची ऑफर
बेडरुममध्ये लटकलेले असते पोळे
मधमाशाचा दंश झाल्यावर प्रचंड वेदना होत असतात. परंतु जर मधमाशांच्या समुहाने हल्ला केल्यास जीवच धोक्यात येत असतो. अशा स्थितीत कुणीच मधमाशांचं पोळं स्वत:च्या घरानजीक तयार व्हावे अशी इच्छा करणार नाही. परंतु एका ठिकाणी लोकांना मधमाशांच्या सान्निध्यात रात्र घालविण्याची संधी मिळत आहे.
लाखो मधमाशांदरम्यान झोपण्यास कुणी सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही याला चेष्टा समजाल. परंतु एका ठिकाणी मधमाशांच्या सान्निध्यात झोपण्याची ऑफर दिली जाते. या ठिकाणी तुमचे स्वागत देखील मधमाशांच्या आवाजातूनच होते आणि बेडरुममध्ये लटकते पोळे तुम्हाला दिसून येईल. इटलीतील मधमाशांचे पालन करणाऱ्या व्यक्तीने हे रंजक ठिकाण तयार केले आहे. रोमांचचे शौकिन असलेल्या लोकांना तो येथे राहण्यासाठी जागा देतो. याचे नाव वंडर बी अँड बी आहे. पूर्ण घरात एकूण 10 लाख मधमाशा असून त्यांच्या पोळ्यांना डेकोरेशनच्या स्वरुपात येथे लावण्यात आले आहे. भिंतींदरम्यान आणि केबिनमध्ये मधमाशांची पोळं आहेत. घरातील बेडवर पहुडल्यावर तुम्हाला सीलिंगवर मधमाशांची पोळं दिसून येतील. झोपलेल्या व्यक्तीला एखाद्या अंगाईगीताप्रमाणे मधमाशांचा आवाज ऐकू येत राहणार आहे. घरात शिरल्यावर संबंधिताचे स्वागत बंबल बीद्वारे होते.
या ठिकाणाची निमिर्ती येथील मालक रोक्को फिलोमेनो यांनी शेतांमध्ये काही स्वयंसेवकांच्या मदतीने केली होती. याकरता 13 लाख रुपयांचा खर्च आला. ही सिंगल बेडरुम स्पेस असून यात 2 लोक राहू शकतात. घरात मधमाशांची एकूण 9 पोळं असून यात 10 लाख मधमाशा आहेत. या ठिकाणी एक रात्र वास्तव्यासाठी 11-14 हजार रुपये खर्च करावे लागतात. येथे सोलर एनर्जीद्वारे बल्ब पेटतो, या भागात वीज नाही. आंघोळीसाठी झाडावर शॉवर लटकलेला असून कॉटेजमध्ये नैसर्गिक सौंदर्यासोबत मधमाशांच्या पोळ्यांचा अनुभव घ्यायचा असल्यास हे सर्वोत्तम ठिकाण आहे.