For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोटे प्रमाणपत्र सादर करून निविदा मिळविलेल्या कंत्राटदारावर गुन्हा

11:01 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
खोटे प्रमाणपत्र सादर करून निविदा मिळविलेल्या कंत्राटदारावर गुन्हा
Advertisement

जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई

Advertisement

बेळगाव : जलजीवन योजनेंतर्गत नळजोडणीच्या कामाचे टेंडर मिळविण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर केलेल्या कंत्राटदाराला जि. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दणका देण्यात आला आहे. याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कंत्राटदाराला ताब्यात घेतले आहे. ग्रामीण पिण्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग चिकोडी यांच्या व्याप्तीत रायबाग तालुक्यातील अलकनूर आणि आळगवाडी गावामध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळजोडणीच्या कामासाठी निविदा मागाविण्यात आली होती. सदर कामाची निविदा अनुसूचित जातीतील कंत्राटदारासाठी राखीव ठेवण्यात आली होती. ई-प्रोक्युर्मेंट वेबसाईटच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या होत्या. 29 लाख 55 हजार व 17 लाख 90 हजारचे सदर काम अनुसूचित जातीच्या वर्गातील कंत्राटदाराला राखीव ठेवले होते. ई-प्रोक्युर्मेंट वेबसाईटच्या माध्यमातून बाळकृष्ण बसवराज चोळचगुड्ड (रा. बी. के. बेंगेरी, मराठा कॉलनी धारवाड) यांनी अर्ज सादर केला होता.

त्यानुसार त्यांना दि. 2 मार्च रोजी काम करण्यासाठी आदेश मिळाला होता. सदर व्यक्तीने अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केले होते. याबाबत एका वृत्तवाहिनीवर खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मागासवर्गीयांसाठी राखीव असणारे काम मिळविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व समाज कल्याण खात्याचे संयुक्त संचालक आणि ग्रामीण पिण्याचे पाणीपुरवठ्याचे चिकोडी विभाग कार्यकारी अभियंता, रायबाग तहसीलदार यांच्या नेतृत्वामध्ये शोधपथकाची नियुक्ती करण्यात आली होती. याचा तपास केल्यानंतर कंत्राटदार बाळकृष्ण बसवराज चोळचगुड्ड हा प्रवर्ग 2 बी जातीमधील असतानाही खोटे जातीचे प्रमाणपत्र लावल्याचे दिसून आले. यावरून त्या कंत्राटदारावर चिकोडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.