ऑफ-बिट...हार्दिक पंड्याचं ‘कमबॅक’...
06:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
हार्दिक पंड्याच्या तंदुऊस्तीबद्दल ज्या काही शंका होत्या त्यांना या अष्टपैलू खेळाडूनं पुरेपूर विराम दिलाय...यंदाच्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर केलेल्या पुनरागमनातील पहिलाच सामना त्याच्यासाठी खूप यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 लढतीत त्यानं 16 धावा देऊन एक गडी टिपला आणि नाबाद 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामुळं भारताला कटकमध्ये पाहुण्यांचा 101 धावांनी पराभव करता आला...
Advertisement
- हार्दिक पंड्याची उपस्थिती ही नेहमीच भारतासाठी प्रेरणादायक राहिलीय. टी-20 विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना त्यानं तंदुऊस्त व दुखापतमुक्त राहून पुन्हा मैदानात उतरावं ही प्रत्येकाची इच्छा होती. मंगळवारी संध्याकाळी त्यानं निराश केलं नाही...
- या सामन्यात हार्दिकनं अनेक पराक्रमांचीही नोंद केली...त्यातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे, बडोद्याचा हा फलंदाज टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार खेचणारा चौथा भारतीय फलंदाज ठरलाय आणि रोहित शर्मा (205), सूर्यकुमार यादव (155) नि विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंच्या यादीत सामील झालाय...
- भारतातर्फे सर्वांत कमी डावांमध्ये 100 षटकार फटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही त्यानं स्थान मिळवलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यानं चार उत्तुंग षटकार हाणले. सूर्यकुमारला हा पल्ला गाठण्यासाठी सर्वांत कमी म्हणजे 49 डाव लागले, तर रोहित शर्मानं त्याची नोंद केली ती 84 डावांमध्ये. 95 डावांनिशी हार्दिक तिसऱ्या क्रमांकावर विसावलाय...
- कटकमधील डावाचं आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्याचं वेगवान अर्धशतक, ते त्यानं फक्त 25 चेंडूंत पूर्ण केलं. त्यासरशी हार्दिक पंड्यानं आपल्या सर्वांत जलद टी-20 अर्धशतकाशी बरोबरी केली. ती खेळी त्यानं 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध केली होती...त्याच्या चार वेगवान अर्धशतकांमधील इतर दोनसाठी त्याला लागले ते 27 चेंडू. त्यापैकी एक त्यानं फटकावलं यंदा पुण्यात इंग्लंडविरुद्ध, तर दुसरं गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध...
- कटकमधील सामन्यानंतरच्या सादरीकरणावेळी बोलताना हार्दिक म्हणाला की, संघाला त्याच्याकडून जी भूमिका हवी असते ती पार पाडण्यासाठी तो नेहमीच प्रेरित होतो संघाच्या गरजा आपल्या वैयक्तिक आवडीपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात, असंही सांगण्यास तो विसरला नाही...
- पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या दोनच प्रमुख वेगवान गोलंदाजांना संधी दिली. कारण पॉवरप्लेनंतर गोलंदाजी करण्यासाठी हार्दिक हाताशी होता. त्यात त्याला यशही मिळून त्यानं पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला पॅव्हेलियनची वाट दाखविली. त्याला पहिल्या सहा षटकांमध्ये आणि अखेरच्या षटकांमध्येही मारा करण्यासाठी सातत्यानं वापरण्यात आलंय...
- आशिया चषकात माऱ्याची सुरुवात करण्याची जबाबदारी पेललेल्या हार्दिकनं 2024 च्या टी-20 विश्वचषकापासून 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्या सहा षटकांत गोलंदाजी केलीय आणि 168 चेंडूंमध्ये पाच बळी घेताना 7.42 चा इकोनॉमी रेट राखलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार करता ही कामगिरी निश्चितच चांगली...जुलै 2024 पासून मधल्या षटकांमध्येही त्याची कामगिरी राहिलीय ती अशीच-आठ सामने, 84 चेंडू अन् 8.14 च्या सरासरीनं दोन बळी...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement