ऑफ-बिट...आंध्रच्या दिमतीला विश्वविजेता प्रशिक्षक...
06:00 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशननं (एसीए) 2025-26 हंगामासाठी गॅरी स्टीड यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करून एक मोठा बदल घडवून आणलाय...स्टीड हे कुणी सामान्य प्रशिक्षक नसून 2021 मध्ये ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चं (डब्ल्यूटीसी) जेतेपद न्यूझीलंडनं खात्यात जमा केलं होतं ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली...
Advertisement
- स्टीड यांनी सात वर्षं न्यूझीलंड क्रिकेटला मार्गदर्शन केलं...2021 मध्ये जागतिक कसोटी स्पर्धा जिंकण्याच्या व्यतिरिक्त 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील किवींची मोहीम पार पडली ती त्यांच्याच देखरेखीखाली. त्यावेळी संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र अंतिम सामन्यात ब्लॅक कॅप्सना इंग्लंडविऊद्ध एक चौकार कमी पडल्यानं पराभव स्वीकारावा लागला...
- त्याच्या नेतृत्वाखाली किवींनी दोन महत्त्वपूर्ण धक्के भारताला दिले...एकदा 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि नंतर जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात. हे दोन्ही सामने इंग्लंडमध्ये झाले...
- न्यूझीलंडनं एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं ते त्यांच्याच कार्यकाळात. या वर्षाच्या सुऊवातीला त्यांनी हे पद सोडलं...अधिकृत निवेदनात स्टीड यांनी म्हटलंय की, आंध्रचं मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यामागं क्रिकेटची आवड हे सर्वांत मोठं कारण...
- मात्र भारतात परदेशी प्रशिक्षकाची स्थानिक पातळीवर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मायकेल बेव्हन यांनी ओडिशाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं, तर लान्स क्लुसनर त्रिपुराचे प्रशिक्षक होते....श्रीलंका आणि बांगलादेशचे माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांनी केरळ आणि बडोदा यांची जबाबदारी सांभाळली होती, तर शॉन विल्यम्स आणि डर्मोट रीव्ह यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं होतं...
- आंध्र गेल्या काही काळापासून संघर्ष करत आलाय. गेल्या हंगामात रणजी चषक स्पर्धेच्या एलिट ‘गट ब’मध्ये फक्त एक विजय त्यांना नोंदविता येऊन वाट्याला आलं ते सहावे स्थान. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलं, तर सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला...
- ‘गॅरी स्टीड हे केवळ प्रशिक्षक नाहीत. ते एक संस्कृती निर्माण करणारे व्यक्ती. त्यांचे आगमन प्रतिभा विकास, रणनीतिक तयारी आणि शिस्तीच्या बाबतीत दर्जा वाढविण्याच्या आमच्या हेतूचा संकेत देते’, संघटनेचे अध्यक्ष के. शिवनाथ म्हणतात...
- आम्ही सुऊवातीला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणू पाहत होतो. मग एका मित्रानं गॅरी यांचा विचार का करत नाही असं सूचविलं. म्हणून आम्ही त्याच्याशी संपर्क साधला आणि पहिल्याच संभाषणापासूनच त्यांची तयारी पाहून आम्हाला धक्का बसला. ते आमच्या संघाची पूर्ण समज घेऊनच बैठकीत दाखल झाले होते, ‘एसीए’चे सचिव सना सतीश बाबू सांगतात...
- 53 वर्षीय स्टीड यांच्याशी सुऊवातीला एका वर्षासाठी करार करण्यात आला असला, तरी मिळालेल्या माहितीनुसार, ते किमान दोन वर्षे राज्य संघासोबत राहण्यास सहमत झालेत. त्यांनी ‘एसीए’ला विनंती केलीय ती नाताळाच्या वेळी न्यूझीलंडमध्ये घरी जाण्यास परवानगी देण्याची. ती ‘एसीए’नं लगेच मान्य केली. भारतातील त्यांचा ‘वर्क व्हिसा’ मंजूर झालाय आणि स्टीड 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement