ऑफ-बिट...उझबेकिस्तानचा युवा सितारा...
06:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गोव्यात झालेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील टायब्रेकरमध्ये चीनच्या वेई यीचा पराभव करून उझबेकिस्तानचा युवा खेळाडू जावोखिर सिंदारोव्हनं या खेळाच्या इतिहासात आपलं नाव कोरलंय...बाद फेरीपूर्वीच एकामागून एक मजबूत दावेदार बाहेर पडत असताना 16 वा मानांकित सिंदारोव्ह नुसता टिकून राहिला नाही, तर त्यानं मोठी झेप घेऊन दाखविली...
Advertisement
- 19 वर्षीय जावोखीर सिंदारोव्ह हा ठरलाय बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत युवा विजेता...सिंदारोव्ह नि त्यानं ज्याला हरविलं तो चीनचा वेई यी या दोघांनीही 2026 च्या पॅंडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात यश मिळविलंय...
- सिंदारोव्हचा विजय बुद्धिबळाच्या जगातील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवितो. गतवर्षी डी. गुकेशनं पटकावलेलं जगज्जेतेपद आणि दिव्या देशमुखनं यंदा जिंकलेला महिलांचा विश्वचषक यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत बडा किताब आपल्या खात्यात जमा करणारा तो तिसरा किशोरवयीन खेळाडू ठरलाय...
- आणखी एक विलक्षण बाब म्हणजे फिडे महिला विश्वचषक जिंकणाऱ्या आणि त्यासोबत ग्रँडमास्टरचा किताब कमावणाऱ्या दिव्या देशमुखचा जन्म 9 डिसेंबर, 2005 रोजी झाला, तर सिंदारोव्ह जन्मला त्याच्या एक दिवस आधी 8 डिसेंबर, 2005 रोजी...
- या उझबेक खेळाडूनं अंतिम फेरी गाठली होती ती आपल्याच देशाच्या नोदिरबेक याकुबबोएव्हविऊद्धच्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात टायब्रेकरमध्येच विजय मिळविल्यानंतर...
- ताश्कंद इथं जन्मलेला जावोखीर सिंदारोव्ह बुद्धिबळच्या जगतातील सर्वांत आशादायक तऊण ताऱ्यांपैकी एक बनलाय...ऑक्टोबर, 2017 मध्ये ‘इंटरनॅशनल मास्टर’ बनल्यानंतर तो 2018 साली फक्त 12 वर्षे आणि 10 महिन्यांच्या वयावर ‘ग्रँडमास्टर’ बनला. हा किताब आपल्या नावापुढं जोडणारा तो त्यावेळी दुसरा वयानं सर्वांत लहान खेळाडू ठरला होता...
- सिंदारोव्ह हा दोन वेळचा उझबेक राष्ट्रीय विजेता असून 2022 मध्ये 44 वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या उझबेकिस्तानच्या संघाचा तो भाग होता. त्यानं उच्च स्तरावरील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलाय आणि आक्रमक व निर्भय शैलीच्या जोरावर त्यानं जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत सातत्यानं प्रगती केलीय...
- तो 2021 च्या बुद्धिबळ विश्वचषकासाठीही पात्र ठरला होता त्यावेळी 121 व्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूनं दुसऱ्या फेरीत अलिरेझा फिरोजाला टायब्रेकरमध्ये हरवून मोठ्या धक्क्याची नोंद केली होती. नंतर चौथ्या फेरीत तो गारद झाला होता...
- 2023 च्या बुद्धिबळ विश्वचषकातही सिंदारोव्हनं अशाच प्रकारे धक्का देताना तिसऱ्या फेरीत मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हला नमवून दाखविलं होतं. पण त्यानंतर अर्जुन एरिगेसीसमोर त्याला नमतं घ्यावं लागलं...
- ऑक्टोबर, 2023 मध्ये सिंदारोव्हनं आशियाई खेळांत वैयक्तिक कांस्यपदक जिंकलं होतं. शिवाय सांघिक स्पर्धेत उझबेकिस्तानला भारत आणि इराणच्या मागं कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला...
- ताज्या निकालानं सिंदारोव्हची एक खंत दूर झाली असेल...पहिल्या ‘ग्लोबल चेस लीग’च्या जेतेपदासाठीच्या निर्णायक टायब्रेकरमध्ये समान पातळीवर असूनही डेन्मार्कच्या जोनास बजेरेविरुद्ध हार स्वीकारावी लागल्यानं त्याचा संघ ‘अपग्रेड मुंबा मास्टर्स’ला ‘त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स’विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं...परंतु यावेळी त्यानं त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक इंटरनॅशनल मास्टर रोमन विदोन्याक किंवा राष्ट्रीय प्रशिक्षक ऊस्तम कासिमदझानोव्ह यांना निराश केलं नाही...
- गेल्या वर्षीच्या ऑलिंपियाडमध्ये जावोखीर सिंदारोव्हला व्लादिमीर क्रॅमनिकनं मार्गदर्शन केलं होतं, ज्यामुळं त्याला सुमारे 40 गुणांची घसरण झाल्यानंतर 2700 चं ‘एलो रेटिंग’ पुन्हा मिळविण्यास मदत झाली होती...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement