ऑफ-बिट...मॅक्सवेलच्या ‘आयपीएल’ कारकिर्दीवर पडदा...
06:00 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
ग्लेन मॅक्सवेल म्हणजे विलक्षण आक्रमक नि फॉर्मात आल्यावर कुठल्याही माऱ्यावर प्रचंड वर्चस्व गाजवण्याची ताकद बाळगणारा खेळाडू...त्याची बॅट तळपू लागली की, गोलंदाजांची धुलाई ही ठरलेली...2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला त्यानं एकहाती बाहेर काढताना फटकावलेलं नाबाद द्विशतक ही एकच खेळी त्याच्या स्फोटक कौशल्याची जाणीव करून देण्यास पुरेशी...पण ‘टी-20’ क्रिकेटला साजेसा हा खेळाडू ‘आयपीएल’मध्ये अलीकडे आपल्या प्रतिभेला व दिल्या जाणाऱ्या रकमेला न्याय देऊ शकला नव्हता...
Advertisement
- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं नुकतीच घोषणा केलीय ती आयपीएल, 2026 च्या लिलावात सहभागी न होण्याची. त्यामुळं लीगमधील त्याच्या कारकिर्दीवर पडदा पडल्यात जमा झालाय. अर्थात लिलावात सहभागी झाला असता, तरी त्याला थंडा प्रतिसाद लाभला असता अन् ते त्यानं हेरलं यात शंका नाही...
- यंदा झालेल्या आयपीएलसाठीच्या लिलावात पंजाब किंग्सनं त्याला करारबद्ध केलं होतं ते 4.2 कोटी ऊपयांना. पण मॅक्सवेलची कामगिरी गेल्या हंगामात सुमार राहिली. त्याला सात सामन्यांमध्ये फक्त 48 धावा जमविता आल्या त्या 8 च्या सरासरीनं. त्यापैकी शेवटच्या चार सामन्यांतील त्याची धावसंख्या एकेरी आकडा ओलांडू शकली नाही, तर बळी घेता आले ते अवघे चार. त्यानंतर स्पर्धा मध्यावर पोहेचलेली असताना बोट फ्रॅक्चर झाल्यामुळं तो बाहेर पडला...मग मॅक्सवेलला पंजाब किंग्सनं सोडून दिलं...
- 2012 साली आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून मॅक्सवेल हा स्पर्धेतील सर्वांत स्फोटक परदेशी खेळाडूंपैकी एक राहिला. 2014 हा त्याचा सर्वोत्कृष्ट हंगाम. त्यात त्यानं 16 डावांमध्ये 187.8 च्या स्ट्राईक रेटनं 552 धावा काढल्या. त्यानंतर 2017 (310 धावा), 2021 (513 धावा), 2022 (301 धावा) आणि 2023 (400 धावा) या हंगामांतही त्याची बॅट तळपली...
- ‘आयपीएल’मधील अनेक अविस्मरणीय हंगामांनंतर मी यावर्षी लिलावात माझं नाव समाविष्ट न करण्याचं ठरविलंय. हा एक मोठा निर्णय आहे आणि या लीगनं मला जे काही दिलंय त्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो’, असं मॅक्सवेलनं इंस्टाग्रामवरील आपल्या संदेशात म्हटलंय...
- ‘आयपीएलनं मला एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून घडविण्यास मदत केलीय. जागतिक दर्जाच्या सहकाऱ्यांसोबत खेळण्याचं, अविश्वसनीय संघांचं प्रतिनिधीत्व करण्याचं आणि ज्यांची उमेद अतुलनीय आहे अशा चाहत्यांसमोर कामगिरी करण्याचं भाग्य मला लाभलं. आठवणी, आव्हानं नि भारताची ऊर्जा माझ्यासोबत कायम राहील’, असंही नमूद करण्यास हा ऑस्ट्रेलियन खेळाडू विसरलेला नाही...
- यंदा जून महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणं पसंत केलेला मॅक्सवेल 13 वर्षं ‘आयपीएल’चा भाग राहिला. त्यात त्यानं 141 सामन्यांतून 155.15 च्या स्ट्राईक रेटनं नि 23.89 च्या सरासरीनं जमविल्या त्या 2819 धावा. त्यात एकही शतक नसलं, तरी 15 अर्धशतकांचा समावेश...
- मॅक्सवेल 2012 मध्ये सर्वप्रथम ‘आयपीएल’ खेळला तो दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे. त्यानंतर 2013 मध्ये त्याला उचललं मुंबई इंडियन्सनं. त्यावर्षी मुंबईनं जेतेपद खिशात घातलं...2014 साली ग्लेनला खेचलं किंग्स इलेव्हन पंजाबनं नि 2017 पर्यंत तो त्याच संघात राहिला...2018 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल दिल्लीच्या संघात परतल्यानंतर 2020 मध्ये पुन्हा पंजाबच्या गोटात पोहोचला, तर 2021 ते 2024 पर्यंत त्यानं प्रतिनिधीत्व केलं रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचं...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement