ऑफ-बिट : 39 व्या वर्षी ‘सरताज’...
06:00 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वयाच्या 39 व्या वर्षी बहुतेक खेळाडूंनी निवृत्तीची वाट धरलेली असते. मात्र जोश्ना चिनप्पा थांबण्याची चिन्हं दिसत नसून भारताच्या या स्क्वॅश स्टारनं नुकताच जपान ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवून आपल्या खात्यात आणखी एक जेतेपद जमा केलं...मागील दशकभरातील हे तिचं पहिलं पीएसए चॅलेंजर जेतेपद आणि एकंदरित विचार करता 11 वा ‘टूर किताब’...
Advertisement
- जोश्ना चिनप्पानं जपान ओपनमध्ये अशा खेळाडूंवर मात केली, ज्या खूप तऊण आणि वेगवान होत्या...बऱ्याच काळानंतर तिला आघाडीच्या 100 खेळाडूंत स्थान मिळालेलं असून जोश्नानं म्हटलंय की, ती जिंकण्याची अपेक्षा करून स्पर्धेत उतरली नव्हती...
- स्पर्धेत बिगरमानांकित खेळाडू म्हणून खेळताना जोश्ना चिनप्पाला आपल्याहून वरच्या क्रमांकांवरील प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागला. तथापि, ही बाब भारतीय खेळाडूला वर्चस्व गाजविण्यापासून रोखू शकली नाही आणि याची परिणती अंतिम फेरीत इजिप्तच्या हया अलीवर विजय मिळवून मुकुट पटकावण्यात झाली. तिच्या दीर्घ कारकिर्दीतील हा 199 वा ‘पीएसए टूर’ होता...
- स्पर्धेतील मोहिमेदरम्यान चिनप्पानं उपउपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित लॉरेन बाल्टायनला हरवलं, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित नार्डिन गारासवर मात केली आणि उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित राणा इस्माइलला नमविलं...
- अंतिम फेरीतही आपला धडाका कायम राखत चिनप्पानं तिसऱ्या मानांकित हया अलीविऊद्ध दोन गेम्सची आघाडी घेतली. त्यानंतर इजिप्शियन खेळाडूनं तिसरा गेम जिंकण्यात यश मिळविलं. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूनं गमावलेला हा एकमेव गेम. चौथ्या गेममध्येही हयानं आघाडी घेतली होती. परंतु अनुभवी जोश्नानं पुढील पाचपैकी चार गुण जिंकून किताब आपल्या नावावर जमा केला...
- चेन्नईची एकेकाळी जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर पोहोचलेली ही खेळाडू गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून स्क्वॅशमधील भारतीय आव्हानाचं नेतृत्व करतेय. या वाटचालीत तिनं जागतिक स्पर्धा, राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांमध्ये पदकं जिंकलीत. चिनप्पाची विजयाची भूक नेहमी तशीच राहिलीय. पण 11 वं ‘पीएसए टूर’ जेतेपद तिच्या नवीन आत्मविश्वास जागवून गेलंय...
- 2023 मध्ये झालेल्या आशियाई खेळांतील सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर गुडघ्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेचा विचार करता या ताज्या विजयी मोहिमेला जास्तच महत्त्व प्राप्त झालंय...‘माझ्या गुडघ्यात एकही कार्टिलेज शिल्लक राहिली नव्हती. सदर शस्त्रक्रिया अशा वेळी झाली जेव्हा मला वाटत होतं की, माझ्या हाती अजूनही काही चांगली वर्षं शिल्लक आहेत, परंतु शस्त्रक्रियेमुळं मला किमान एक वर्ष मागं जावं लागलं. ही शस्त्रक्रिया अधिक चांगल्या आयुष्यासाठी होती. कारण खूप वेदना होत होत्या आणि मी चालू शकत नव्हते किंवा गाडी चालवू शकत नव्हते’, 19 वेळा राष्ट्रीय एकेरी किताब पटकावलेली ही खेळाडू सांगते...
- ‘पण सर्जन म्हणाले की, मी पुन्हा खेळू शकेन. आणि मी विचार केला की, बघूया तरी पुढं काय होतं ते. मात्र प्राधान्य नेहमीच आरोग्याला राहिलं. स्क्वॅश हा खरोखरच दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर होता’, जोश्ना चिनप्पा म्हणते...
- मग तिला आधी व्यवस्थित चालणं जाग्यावर घालावं लागलं. परंतु कोर्टवर लय मिळवण्यास तिला जास्त वेळ लागला नाही. तिनं राष्ट्रीय महासंघाद्वारे देखभाल केल्या जाणाऱ्या चेन्नई येथील इंडियन स्क्वॅश अकादमीमध्ये सराव चालू ठेवला अन् शस्त्रक्रियेनंतर फक्त पाचच महिन्यांनी मे, 2024 मध्ये अभय सिंगसह मिश्र दुहेरीचं राष्ट्रीय विजेतेपद जिंकलं...
- मध्यंतरी आघाडीच्या 400 खेळाडूंतही समाविष्ट नसलेली चिनप्पा आता जगात 87 व्या क्रमांकावर पोहोचलीय अन् तिला डोळ्यांसमोर दिसू लागलेत ते येत्या वर्षी होणार असलेले आशियाई खेळ...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement