ऑफ-बिट...‘पॉवर हिटर’चा ‘गूडबाय’...
06:00 AM Jul 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
आंद्रे रसेल...वेस्ट इंडिजच्या कित्येक लहरी, सातत्य नसलेल्या, पण ज्या दिवशी सूर गवसेल त्या वेळी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीची कत्तल करणाऱ्या फलंदाजांपैकी एक...नुकतीच या ‘पॉवर हिटर’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यानिमित्तानं त्याच्या कारकिर्दीवर टाकलेली नजर...
Advertisement
- आंद्रे रसेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली ती एका जबरदस्त खेळीसह. परंतु मंगळवारी सॅबिना पार्क इथं झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजला विजयी करून आपली मोहीम संपविण्याचं स्वप्न त्याला पूर्ण करता नाही अन् ऑस्ट्रेलियानं त्यांना आठ गडी राखून पराभूत केलं...
- आपल्या 86 व्या आणि अंतिम टी-20 सामन्यात 37 वर्षीय रसेलनं शेवटच्या वेळी आपल्या घरच्या प्रेक्षकांना रिझविताना फक्त 15 चेंडूत चार षटकार आणि दोन चौकारांसह 36 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर येऊन त्यानं उशिरा ही आतषबाजी केली. मग ज्या मैदानावर त्याचा क्रिकेट प्रवास सुरू झाला होता त्या सॅबिना पार्कवरून बाहेर पडताना लोकांनी उभं राहून अन् टाळ्यांचा कडकडाट करून त्याला मानवंदना वाहिली...
- 2019 पासून आंद्रे रसेल वेस्ट इंडिजतर्फे फक्त टी-20 सामने खेळलाय. या प्रकारात त्यानं 86 लढतींमध्ये 22 च्या सरासरीनं आणि 163.80 च्या स्ट्राईक रेटनं 1122 धावा फटकावल्याहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आणि सर्वोच्च डाव 71 धावांचा...गोलंदाजीच्या बाबतीत आंद्रेनं 31.46 च्या सरासरीनं 61 बळी घेतलेत अन् त्यात सर्वोत्तम कामगिरी 19 धावांत 3 बळींची...
- त्यानं निवृत्ती आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या काही महिने आधी घेतलीय. सदर स्पर्धा फेब्रुवारी, 2026 मध्ये भारत व श्रीलंकेत होईल. निकोलस पूरननं 29 व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर रसेल हा वेस्ट इंडिजचा अलीकडच्या काळातील निवृत्त झालेला दुसरा मोठा खेळाडू...
- आपल्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रसेल फक्त एकच कसोटी सामना खेळला. तो 56 एकदिवसीय सामने खेळलाय, ज्यामध्ये त्यानं 27.21 च्या सरासरीनं आणि 130 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 1,034 धावा केल्या. ‘वनडे’त आंद्रेच्या खात्यावर चार अर्धशतकं असून नाबाद 92 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या. त्यानं 70 बळीही घेतलेत आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी 35 धावांत 4 बळी...
- आंद्रे रसेल 2012 आणि 2016 मधील वेस्ट इंडिजच्या आयसीसी टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता...त्यानं वेस्ट इंडिजतर्फे खेळताना सर्वात आनंददायी क्षण म्हणून निवडलंय ते 2016 च्या टी-20 विश्वचषकाच्या मुंबईतील भारताविऊद्धच्या उपांत्य सामन्यातील आपल्या स्फोटक खेळीला...त्यावेळी विंडीज 193 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग करत होतं अन् संघाला 41 चेंडूंत 77 धावांची आवश्यकता असताना रसेल पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरला. त्यानं फक्त 20 चेंडूंत 33 धावा फटकावल्या, यामध्ये मिडविकेटवरून विराट कोहलीला खेचलेला संस्मरणीय षटकारही समाविष्ट होता. त्याच्या त्या तुफानी खेळीनं कॅरिबियन संघाला दोन चेंडू शिल्लक असताना अंतिम फेरीत पोहोचविलं...
- रसेल म्हणजे जगभरातील टी-20 लीगमध्ये झळकणारं एक प्रमुख नाव. तिथं तो 561 सामने खेळलाय आणि 26.39 च्या सरासरीनं तसंच 168 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं त्यानं 9,316 धावा केल्याहेत. यात दोन शतकं आणि 33 अर्धशतकांचा अंतर्भाव आणि नाबाद 121 ही सर्वोच्च धावसंख्या...याशिवाय गोलंदाज म्हणून त्यानं 25.85 च्या सरासरीनं 485 बळी घेतलेत. यामध्ये सर्वोत्तम कामगिरी 15 धावांत 5 बळींची...
- भारतीयांना आंद्रे रसेलमधल्या फटकेबाजाचा चांगलाच परिचय आहे तो कोलकाता नाइट रायडर्सतर्फे ‘आयपीएल’मध्ये खेळताना त्यानं बजावलेल्या धमाकेदार कामगिरीमुळं. यंदा त्यानं निराशा केलेली असली, तरी तो ‘केकेआर’चा मोलाचा ‘पॉवर हिटर’ राहिलाय. गेल्या वर्षी जेतेपदास हातभार लावताना त्यानं 15 सामन्यांतून 222 धावा फटकावल्या होत्या आणि 19 बळी मिळविले होते...त्यानं आयपीएल कारकिर्दीत 140 सामन्यांत 12 अर्धशतकांसह फटकावल्याहेत त्या 2651 धावा अन् खात्यात जमा केलेत ते 123 बळी...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement
Next Article