ऑफ-बिट...‘दिव्य’ कामगिरी...
06:00 AM Aug 01, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बटुमी, जॉर्जिया इथं बुद्धिबळपटू दिव्या देशमुख महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिलाच बनली नाही, तर तिनं त्या भरात ग्रँडमास्टरचा किताबही मिळवला. भारताची ती 88 वी ग्रँडमास्टर आणि हम्पी, हरिका द्रोणवल्ली नि वैशाली यांच्यानंतर अशी झेप घेणारी फक्त चौथी भारतीय महिला...
Advertisement
- 9 डिसेंबर, 2005 रोजी नागपुरात जन्मलेली दिव्या देशमुख यशस्वी कुटुंबात वाढलीय. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता देशमुख हे दोघेही वैद्यकीय व्यावसायिक. त्यांनी तिला कधीही बुद्धिबळात ढकललं नाही, तर चार वर्षांची असताना दिव्यानंच हा खेळ निवडला...
- लहानपणी तिला तिच्या मोठ्या बहिणीसोबत बॅडमिंटनच्या वर्गात जायचं होतं. पण जाळं खूप जास्त उंचीवर होतं अन् चार वर्षांच्या मुलीला तिथंपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. जवळच त्याच इमारतीत बुद्धिबळाचा वर्ग चालत होता. तिच्या पालकांनी तिला तिथं प्रवेश दिला...
- वयाच्या 10 व्या वर्षी ती विविध वयोगटांतील जागतिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करू लागली होती. 13 वर्षांची असतानाच ती दबावाला बळी न पडता संयमानं खेळण्यासाठी ओळखली जाऊ लागली होती. 2017 च्या एका व्हिडिओमध्ये तऊण दिव्या आपण कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला घाबरत नाही आणि शेवटपर्यंत लढताना कधीही थकत नाही, असं सांगताना आढळते. फिडे महिला विश्वचषकात दर्शन घडलं ते तिच्या याच वृत्तीचं...
- 2012 मध्ये देशमुखनं 7 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. हा तिचा पहिला चषक. तिनं पुढं 10 वर्षांखालील (दर्बान, 2014) अन् 12 वर्षांखालील (ब्राझील, 2017) स्पर्धांतून जागतिक युवा जेतेपदं आपल्या नावावर जमा केली...
- यादरम्यान अभ्यासही मागं पडला नाही हे विशेष...भवन भगवानदास पुरोहित विद्यामंदिरात शिक्षण घेताना दिव्यानं परीक्षा आणि स्पर्धा यांच्यामधील कसरत यशस्वीरीत्या केली. तिला इतर प्रतिभावान खेळाडूंपेक्षा वेगळी ठरविणारी एक बाब ती ही...बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं शैक्षणिक प्रवास सुरू ठेवण्यासाठी दूरस्थ शिक्षणपद्धती निवडली. सध्या ती क्रीडा मानसशास्त्र, परफॉरमन्स सायन्स आणि बुद्धिबळातील डेटा अॅनेलेटिक्सचा अभ्यास करतेय. यामुळं आपला खेळ आणि मानसिकतेला अधिक धार येईल असं तिला वाटतंय...
- दिव्यानं फिडे विश्वचषकात अव्वल मानांकित म्हणून प्रवेश केला नव्हता...तसं पहिल्यास 2023 च्या टाटा स्टील महिला रॅपिड स्पर्धेतही तिनं शेवटच्या क्षणी प्रवेश केला होता आणि ती सर्वांत कमी मानांकित खेळाडू होती. तरीही ती जागतिक विजेती जू वेनजुनपेक्षा पुढं राहिली...
- 2023 मध्ये तिनं आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धा, तर 2024 साली 11 पेकी 10 गुणांसह जागतिक 20 वर्षांखालील मुलींची स्पर्धा खिशात घातली. प्रत्येक विजय हा शांतपणे मिळविलेला आणि सातत्य दाखविणारा होता...
- याशिवाय दिव्या 2020 मध्ये फिडे ऑनलाईन चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघाचा भाग होती. 2022 च्या महिला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिनं कांस्यपदक पटकावलं, तर 2024 च्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दिव्या देशमुखनं भारतीय संघाला सुवर्णावर डल्ला मारण्याकामी मोलची मदत केली तसंच वैयक्तिक सुवर्णपदकाचीही कमाई केली...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement
Next Article