ऑफ-बिट : दणक्यात पुनरागमन...
06:00 AM Nov 21, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
दक्षिण आफ्रिकेनं कोलकाता इथं भारतावर मिळविलेल्या कसोटी विजयाचा एक शिल्पकार राहिला तो दोन्ही डावांत 4 बळी मिळविणारा ऑफस्पिनर सायमन हार्मर...यापूर्वी तो आपल्या भूमीत आला होता पार 2015 साली. त्यावेळीही त्यानं काही कमी चांगला मारा केला नव्हता. पण त्यानंतर हार्मरला संघातलं स्थान गमवावं लागलं अन् पुनरागमन करण्यासाठी बरीच वर्षं वाट पाहावी लागली...
Advertisement
- दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खूप यशस्वी झालेला सायमन हार्मर 2015 मध्ये जेव्हा राष्ट्रीय संघाच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला तेव्हा फक्त दोन सामने त्याच्या खात्यात जमा होते. उजव्या हाताने ऑफस्पिन टाकणारा आणि बोटांनी चेंडू वळविणारा हा खेळाडू आशियाई परिस्थितीचा विचार करता उपयुक्त असा होता...
- त्या वर्षाच्या सुऊवातीला त्यानं यशस्वी पदार्पण करताना केपटाऊनमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजविऊद्ध 153 धावांत सात बळी घेतले होते. भारत दौऱ्यापूर्वी झालेल्या बांगलादेश दौऱ्यावरही मुख्य फिरकी गोलंदाजांपैकी हार्मर एक होता...
- बेंगळूर येथील सुरुवातीची कसोटी व दिल्लीतील शेवटच्या लढतीत त्याला संधी दिली गेली नाही.s मात्र मोहाली व नागपूर इथं तो खेळला. पोषक खेळपट्ट्यांवर त्याच्या फिरकानं दोन सामन्यांत एकूण 254 धावा देऊन 10 बळी घेतले. यामध्ये दोनदा मिळविलेल्या चार बळींचा समावेश...परंतु दक्षिण आफ्रिकेला त्या मालिकेत 3-0 अशा फरकानं पत्करावा लागल्यानं त्याच्या कामगिरीवर पाणी पडलं...
- ‘2015 मध्ये राष्ट्रीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मला जाणवलं की, मी पुरेसा चांगला नाही’, तो म्हणतो...मग 2016 मध्ये उमेश पटवाल यांच्या मार्गदर्शनाखाली फिरकी सुधारण्याच्या मोहिमेवर तो मुंबईत दाखल झाला...‘त्यावेळी फिरकी गोलंदाजीबद्दल बऱ्याच अशा गोष्टी कळल्या ज्या मला माहित नव्हत्या. कारकिर्दीतील या टप्प्यानं मला सुधारण्यासाठी, विकसित होण्यासाठी आणि एक चांगला फिरकी गोलंदाज बनण्यासाठी आवश्यक हत्यारं दिली’, हार्मर लक्ष वेधते...
- भारताविरुद्धच्या मालिकेनं हार्मरची कसोटी कारकीर्द संपविलीय असं वाटत असताना त्यानं इंग्लंडची वाट पकडली. 2017 साली हार्मरनं ‘कोल्पॅक’ करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळं इसेक्सबरोबर तो कौंटीचे नऊ हंगाम खेळला. त्यानं त्याचा फायदा घेऊन आपला खेळ पुढील स्तरावर नेला. त्या नऊ वर्षांत तो एकदाही कौंटीतील बळी घेणाऱ्या पहिल्या दहा गोलंदाजांच्या यादीबाहेर गेला नाही. 2019, 2020 नि 2022 मध्ये तर तो आघाडीचा गोलंदाज राहिला...
- युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर ‘कोल्पॅक’ प्रणाली संपली अन् सायमन हार्मर दक्षिण आफ्रिकेसाठी उपलब्ध झाला. परंतु तोवर संघातील आघाडीचा फिरकी गोलंदाज म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं होतं ते केशव महाराजनं. हार्मरला समजलं की, जेव्हा दक्षिण आफ्रिकेला अतिरिक्त फिरकीपटूची आवश्यकता असेल तेव्हाच त्याला बोलावणं येईल...
- या पार्श्वभूमीवर तो मार्च, 2022 मध्ये कसोटी संघात परतला खरा, पण ते पुनरागमन आणि अलीकडील पाकिस्तान दौरा यादरम्यान त्याच्या वाट्याला आल्या फक्त पाच कसोटी लढती. जानेवारी, 2023 ते ऑक्टोबर, 2025 या कालावधीत एकाही सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही...
- हार्मरच्या कारकिर्दीतील आणखी एक अध्याय सुरू झाला तो सध्याचे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांना संधी देण्याचं आवाहन त्यानं वेळीच केल्यानं...दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्धची नुकतीच झालेली मालिका बरोबरीत सोडविणं शक्य झालं ते त्याच्यामुळंही. रावळपिंडीत संघानं नोंदविलेल्या विजयात सायमननं मोठा वाटा उचलताना पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात 50 धावा देऊन 6 बळी टिपले. इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेबाहेर पाच बळी घेण्याची त्याची ही पहिलीच खेप. त्यावर आता साज चढवून गेलीय ती भारताविरुद्धची कामगिरी...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement
Next Article