ओडिशा वॉरियर्सची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ रांची (झारखंड)
ओडिशा वॉरियर्सने रांची येथे दिल्ली एसजी पायपर्सचा 4-0 असा पराभव करून महिला हॉकी इंडिया लीग (एचआयएल) 2024-25 ची सुऊवात जोरदार पदद्धतीने केली आहे. ओडिशा वॉरियर्ससाठी यिब्बी जॅनसेन (16 वे आणि 37 वे मिनिट), बलजित कौर (42 वे मिनिट) आणि फ्रीक मोस (43 वे मिनिट) यांनी गोल केले.
त्यापूर्वी महिला हॉकी इंडिया लीगची सुऊवात एका दिमाखदार समारंभाने झाली, जिथे कलाकारांनी झारखंडची संस्कृती प्रदर्शित केली. झारखंड विधानसभेच्या सदस्या आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी चार महिला एचआयएल संघांच्या कर्णधारांसह महिला हॉकी इंडिया लीग ट्रॉफीचे अनावरण केले.
त्यानंतर झालेल्या सामन्यातील पहिले सत्र सावधगिरीचे राहिले. कारण पहिल्यांदाच खेळणाऱ्या दोन्ही संघांनी लयीत येण्यासाठी वेळ काढला. त्यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले. त्यानंतर यिब्बी जॅनसेनला महिला हॉकी इंडिया लीगमधील पहिला गोल करण्याची संधी मिळाली. ओडिशा वॉरियर्सने 16 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला असता खेळातील सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक असलेल्या जॅनसेनने कोणतीही चूक केली नाही. पायपर्सना लगेचच दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यांचे गोलामध्ये रुपांतर करणे त्यांना जमले नाही.
मध्यांतरापर्यंत वॉरियर्सचा बचाव मजबूत राहिला आणि तो पुढे अधिक भक्कम होत राहिला. तिसऱ्या सत्राच्या मध्यास वॉरियर्सने त्यांची आघाडी वाढविली आणि जॅनसेनने पुन्हा एकदा ड्रॅग फ्लिकवर अचूक नेम साधला. पाच मिनिटांनंतर वॉरियर्सची आघाडी 3-0 झाली. यावेळी बलजीत कौरने गोलरक्षकाला चकविले. पाईपर्सना पुन्हा संघटित होण्यासाठी फारसा वेळ न देता मग फ्रीक मोसने चौथा गोल केला. 49 व्या मिनिटाला कर्णधार नेहाला पिवळे कार्ड मिळाल्यानंतर वॉरियर्सना पाच मिनिटांसाठी 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले. पण पायपर्सना त्याचा फायदा घेता आला नाही.