पांगुळ गल्लीत होणार सम-विषम पार्किंग
वाहतूक पोलिसांचा पुढाकार
बेळगाव : पांगुळ गल्ली परिसरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी या परिसरातील पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. शहरातील इतर ठिकाणांप्रमाणेच सम-विषम पार्किंग करण्यावर भर देण्यात आला आहे. पांगुळ गल्लीत खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पार्किंगला शिस्त नसल्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊन वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी पांगुळ गल्ली परिसरात मोहीम राबविली. रस्त्यावर ठेवलेले फलक हटविण्यात आले. या परिसरातही सम-विषम पार्किंग सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. पांगुळ गल्लीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.