मिरामार येथील ‘ओशनिक’ इमारतीला भीषण आग
अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला
प्रतिनिधी/ पणजी
मिरामार येथील धेम्पे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय परिसरातील ‘ओशनिक’ अपार्टमेंट या इमारतीच्या गच्चीवरील मेसर्स एपीएस वॉटर सिस्टमच्या स्टोरेज रूमला आग लागण्याची घटना घडली. ही आग भीषण स्वऊपात होती. त्यामुळे आगीचे व धुराचे लोट परिसरात पसरले होते.
याबाबत माहिती अशी की, मिरामार येथील धेम्पे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय परिसरातील ‘ओशनिक’ अपार्टमेंटला आग लागल्याची माहिती श्रीमती हयास प्रजापती यांनी अग्निशमन दलाला दिली. गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांनी त्वरित दलाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन घटनास्थळी पाण्याच्या बंब पाठवून दिले. अंदाजे 100 - 120 चौरस मीटर परिसरात लागलेल्या या आगीवर वेळेत पाण्याचा मारा करण्यात आल्याने मोठे नुकसान टळले.
या आगीत साठवणूक कक्ष, छप्पर, रसायन, द्रव, कोरडी रासायनिक पावडर व कापड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ‘ओशनिक’ या इमारतीचा काही भाग आगीत जळाला. दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान इमारतीला आग लागली होती. कडक ऊन्हामुळे आग इतस्तत: पसरू नये, यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी परीश्रम घेतले. ‘ओशनिक’ इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी जीए 07 जी - 0350, जीए 01 जी -7600, जीए 07 जी - 7101, जीए 07 जी - 2002 या क्रमांकाचे चार पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये म्हापसा आणि पिळर्ण अग्निशामक दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते. चार पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू होते.
यावेळी तिसवाडीचे मामलेदार कौशिक देसाई यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांनी आगीच्या परिस्थितीचा आढावा फोनवरून घेण्याचे काम सुरू केले होते. घटनास्थळी हवी ती मदत पाठवून देण्यासाठी त्यांनी दलाचे अधिकारी रूपेश आर. सावंत व नीलेश फर्नांडिस यांना सूचना दिल्या.
इमारतीचे मालक अजित सिंग यांच्या मते, इमारतीच्या टेरेसवरील स्टोअर रूमच्या शेजारी फॅब्रिकेशनचे काम करत असताना वेल्डिंग मशीनमधून ठिणगी पडून ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेचा नेमका आकडा समजू शकला नाही.
दलाचे अधिकारी रूपेश आर. सावंत व नीलेश फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली आग विझविण्यासाठी अधिकारी सूरज व्ही. घाडी, अमित व्ही. रिवोणकर, नितीन आर. शिरोडकर, सतीश एस. मोदीगर, उस्मान खान, जवानांमध्ये विनायक व्ही. फडते, संकेत मांद्रेकर, गोपाल शिंदे, दत्तराज सावंत, रणजित रेडकर, नारायण मोर्लेकर, रोनी डिसोझा, रेशवेत नाईक, संजय मलिक, गौरेह हलणकर यांनी परिश्रम घेतले.