पावसाचे विक्रमी दीड शतक
आतापर्यंत वाळपईत सर्वाधिक 185 इंच : मुसळधार पावसाबरोबर वाऱ्याच्या वेगात वाढ
पणजी : राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गुजरातपासून केरळ तटापर्यंत परिणाम जाणवत असून काल सोमवारी गोव्यात पावसाचा फार मोठा जोर नव्हता, तरी देखील वादळी वाऱ्याचा वेग वाढला आहे. आजही गोव्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी गोव्यात सर्वाधिक 4 इंच पावसाची नोंद वाळपई व फोंडा येथे झाली. जुने गोवेमध्ये 2.5 इंच पाऊस पडला. काणकोणमध्ये 2.5 इंच, पेडणे 2 इंच, सांगे 1.75 इंच, पणजी 1.5 इंच, दाबोळी, मुरगाव, मडगाव, केपे व सांखळी या ठिकाणी प्रत्येकी दीड इंच पावसाची नोंद झाली. म्हापसामध्ये सव्वा इंच पाऊस पडला. यामुळे गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाली. या दोन इंचांची भर पडल्याने मोसमातील एकूण पाऊस 151 इंच झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 45 टक्के अधिक आहे. आजपासून दि. 30 ऑगस्टपर्यंत गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून या दिवसांकरीता यलो अलर्ट घोषित केले आहे.
वाळपईत 185 इंच पावसाची विक्रमी नोंद
वाळपई पर्जन्यमापक केंद्रावर आतापर्यंत 185 इंच एवढा विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदाचा अधिकृत मोसम संपुष्टात येण्यासाठी अद्याप 35 दिवस शिल्लक आहेत. सध्याची स्थिती पाहता ऑगस्ट अखेरीस वाळपईत पाऊस इंचाचे द्विशतक गाठणार आहे. यंदाच्या या मोसमात सांगेमध्ये 182.50 इंच पावसाची नोंद झालेली आहे. सांखळीमध्ये 163.5 इंच पाऊस आतापर्यंत नोंदविला गेला. केपेमध्ये 161 इंच पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. यंदा पावसाने कहर केलेला आहे. त्याचा परिणाम गोव्यातील पारंपरिक काकडी, भेंडी, कारली इत्यादी पावसाळी भाज्यांवर झालेला आहे. अति पावसामुळे वेली कुजून गेल्या. त्यामुळे उत्पादन घटले. आगामी 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या खाडीमध्येही आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.