For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्वयंदीप्त’वर भ्रष्टाचाराचा गुन्हा

11:37 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘स्वयंदीप्त’वर भ्रष्टाचाराचा गुन्हा
Advertisement

स्मार्ट सिटी कामात 82.87 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ठपका : एका कामासाठी अनेक सल्लागार, बनावट बिले केली अदा

Advertisement

पणजी : इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाचा माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदीप्त पाल चौधरी याच्याविऊद्ध दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी 82.87 लाख ऊपयांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, या प्रकरणातील पुरावे एसीबीने प्राप्त केलेले आहेत. स्वयंदीप्त पाल चौधरी याच्याविरोधात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मामू हागे यांनी तक्रार दाखल केली होती. स्वयंदीप्त पाल चौधरी याच्या भ्रष्टाचाराविषयी दैनिक तरुण भारतने अनेकवेळा सविस्तरपणे पर्दाफाश केला होता. मात्र संबंधित यंत्रणांनी त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर आता त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करावा लागला आहे.

स्वत:च्या फायद्यासाठी केला वापर

Advertisement

मामू हागे यांनी जुलै महिन्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयित स्वयंदीप्त पाल चौधरी हा 1 एप्रिल 2018 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाचा माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होता. त्या काळात त्याने स्वत:च्या फायद्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधेचा अनधिकृत वापर करून अफरातफर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

क्रेडिट कार्डद्वारे 27.50 लाखांचा खर्च

चौधरीने क्रेडिट कार्डद्वारे 27.50 लाख ऊपयांचा स्वत:च्या फायद्यासाठी अनियमित खर्च केला. तसेच पॅटी कॅश खात्यातून 1.06 लाख ऊपयांचा वैयक्तिक खर्चदेखील केला असल्याचे तक्रारीत स्पष्ट झाले आहे.

एकाच कामासाठी अनेक सल्लागार 

भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे चौधरी याने स्मार्ट सिटी महामंडळाच्या परवानगीशिवाय निर्णय घेतले व खर्च केला. एकाच कामासाठी अनेक सल्लागारांची नियुक्ती केली होती, असेही उघड झाले आहे.

बनावट बिलांची रक्कम केली अदा 

एकाच कामासाठी अनेक सल्लागारांची नियुक्ती करुनच हा चौधरी थांबला नाही, तर त्याने बनावट बिले तयार करून त्या बिलांची रक्कम अदा केली. वरील सर्व प्रकारामुळे चौधरी याने सरकारचे 82.87 लाख ऊपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एसीबीचे उपअधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश वळवईकर यांनी स्वयंदिप्त पाल चौधरी याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

चौधरीविरोधातील दस्तावेजांची तपासणी सुरू 

स्वयंदीप्त पाल चौधरी याच्याविऊद्ध एसीबीने भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर दस्तावेजांच्या तपासणीला सुरुवात केली आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या हाती ठोस पुरावे लागले असून, आणखी कोणत्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे काय? त्या दिशेने भ्रष्टाचार विरोधी पथक तपास करीत आहे. पथकाकडे सबळ पुरावे असल्यामुळे चौधरीला चौकशीसाठी केव्हाही समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

मोठ्या घोटाळ्याचा होऊ शकतो पर्दाफाश

दक्षता खात्याने स्वयंदीप्त पाल चौधरी याच्याविरोधात केवळ 82.87 लाख ऊपयांच्या घोटाळ्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. परंतु स्मार्ट सिटीच्या कामांसाठी कोट्यावधी ऊपयांचा खर्च केलेला आहे. तसेच चौधरी याने कारभार हाताळताना तो पारदर्शीपणे हाताळला नसल्याने यामध्ये मोठ्या घोटाळ्याची शक्यता आहे. केवळ 82.87 लाख ऊपयांचाच हा भ्रष्टाचार नसून तो मोठा असण्याची शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांत व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी मुळापासून केल्यास आणखी मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.