'शिवाजी हौसिंग' चौकात अडथळ्यांची शर्यत !
सांगली / संजय गायकवाड :
सांगली आणि माधवनगर या दोन शहरांना जोडणाऱ्या आणि जुन्या बुधगाव रोडवरील दुचाकी वाहनांची मोठी ये जा असणाऱ्या वसंतदादा साखर कारखान्यासमोरील शिवाजी हौसिंग सोसायटी नजिकच्या अगदीच लहान असणाऱ्या चौकात वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करताना नाकी नऊ आले आहे. अंधाराचे साम्राज्य, भटकी कुत्री, मोकाट जनावरे, अनावश्यक गतीरोधक आणि अरुंद रस्ता या अन्य चौकात असणाऱ्या समस्या याही चौकात आहेत. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकांच्या सुशोभिकरणाबरोबरच चौकातील समस्या दुर करून चौकांच्या रूंदीकरणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
साखर कारखाना परिसरातील शिवाजी हौसिंग सोसायटी नजिकचा चौक तसा फार मोठा नाही. पण हा चौक विशेषतः चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी लोकांना खूपच उपयोगी पडलेला चौक आहे. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना दीड ते पावणेदोन वर्ष सांगली माधवनगर रोडवरील वाहतूक ज्या पर्यायी तीन मार्गाने वळविण्यात आली होती. त्यात जुना बुधगाव रोडही होता.
जुन्या बुधगाव रोडवरून दुचाकी गाड्यांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे. चिंतामणीनगर येथील नव्या चारपदरी पुलावरून वाहतूक सुरू होवूनही जुन्या बुधगाव रोडवरील दुचाकी आणि हलकी वाहने यांची वाहतूक कमी झालेली नाही. पंचशीलनगर येथील रेल्वेगेट पार केल्यानंतर माधवनगर, बुधगावकडे जाणारे अनेक दुचाकीस्वार हे शांतिनिकेतन कॉर्नर, गोसावी गल्ली, लक्ष्मीनगर येथून माधवनगर जकात नाका येथे निघतात. तर आजही या मार्गावरील अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक हे शांतिनिकेतनसमोरील कॉर्नरपासून शिवाजी हौसिंग सोसायटी, पॉप्युलर बेकरी समोरून साखर कारखाना गेटसमोरून माधवनगरच्या दिशेला जातात. संपत चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जुना बुधगाव रोड आजही पर्यायी मार्ग म्हणून दुचाकीस्वारांना सोयीचा आणि जवळचा वाटतो.
शिवाजी हौसिंग सोसायटी चौकाच्या आसपास म्हंटले तर जुन्या बुधगाव रोडवर लक्ष्मीनगरपर्यंत असंख्य गतीरोधक तयार केलेले आहेत. अवघ्या पाच मिनिटांच्या अतंरातील रस्त्यावर किमान आठ ठिकाणी गतीरोधक बसविली आहेत. त्यामुळे जुन्या बुधगाव रोडवरील वाहनचालकांना या रोडने ये जा करताना कसरत करावी लागते.
शिवाजी हौसिंगकडून साखर कारखाना गेटकडे वळणाऱ्या दुचाकीस्वारांना अतिशय संथगतीने पुढे जावे लागते. मुळातच हा चौक अतिशय छोटा असल्याने वाहने वळताना समोरून जर मोठे वाहन आले तर येथून एकाचवेळी दोन मोठ्या वाहनांना वळणे शक्य होत नाही.
चौकाच्या दोन्ही बाजूला मोठ्या गटारी आहेत. त्यामुळे या चौकातून वाहने पुढे नेताना ती गटारीत जाणार नाहीत याची वाहनचालकांना दक्षता घ्यावी लागते.
दुसरीकडे या चौकातून अनेक वाहनचालक हे वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. दुचाकीवरून तिघे चौघेजण भरधावपणे फिरत असतात. पंचशीलनगर येथे दर शुक्रवारी मोठा बाजार भरतो. हा बाजार जुन्या बुधगाव रोडपासून आतमध्ये भरतो. अशातच काही वाहनचालक हे भरधावपणे गाडया पळवितात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जुन्या बुधगाव रोडवर पंचशीलनगर येथेही दुपदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्यात आहे. येथील उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाल्यावर चिंतामणीनगर प्रमाणेच जुन्या बुधगाव रोडवरील वाहतूकीत मोठी वाढ होणार आहे. अशावेळी संपत चौक, शिवाजी हौसिंग सोसायटी चौक आणि माधवनगर जकात नाका असे तीन चौक मोठे आणि रुंद करावे लागणार आहेत.
जुन्या बुधगाव रोडवरील अनावश्यक गतीरोधक काढून टाकण्याची आवश्यकता आहे. शिवाजी हौसिंग सोसायटी चौकात भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे यांचाही त्रास आहे. चौकातून ये जा करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या पाठीमागे ही कुत्री लागतात. अगदी साखर कारखाना गेट आणि कामगार भवनच्या समोरील चौक ते सदाशिव पेट्रोल पंपापर्यंत कुत्र्यांची झुंड थांबलेली असते. त्यामुळे वाहनचालकांच्यात भितीचे वातावरण आहे. शिवाजी हौसिंग चौकासह संपत चौक आणि माधवनगर जकात नाका चौक अशा तिन्ही ठिकाणी प्रखर वीजेचे दिवे बसविण्याचीही आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने शहराच्या उपनगरातील आणि विस्तारीत भागातील चौकाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.