For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्य प्रदेशात भाजपकडून ओबीसी चेहरा

06:45 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
मध्य प्रदेशात भाजपकडून ओबीसी चेहरा
Bhopal: BJP MLA from Ujjain South Mohan Yadav being greeted by Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan, state President VD Sharma and others on his election as the BJP's legislature party leader in Madhya Pradesh, in Bhopal, Monday, Dec. 11, 2023. Yadav will be the next CM of the state. (PTI Photo) (PTI12_11_2023_000173B)
Advertisement

मोहन यादव होणार नवे मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्रीपदी 58 वषीय मोहन यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने या राज्यात ‘ओबीसी’ चेहरा पुढे केल्याने चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंह चौहान यांचा पत्ता कट झाला आहे. भोपाळ येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवराजसिंह यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून येतात.

Advertisement

मोहन यादव यांच्या नावाची घोषणा अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. ते उज्जैन दक्षिणचे आमदार असून शिवराज सरकारमध्ये मंत्री होते. तसेच ते आरएसएसचे अत्यंत जवळचे मानले जातात. उज्जैन विभागातील बड्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. विद्यार्थी राजकारणातून कारकिर्दीला सुऊवात करणारे मोहन यादव हे भाजपचे प्रस्थापित नेते आहेत. त्यांनी मोठ्या संघर्षानंतर राजकारणात मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली आहे. हायकमांड, निरीक्षक आणि आमदारांनी त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी दिली आहे.

शिवराजांचे चरणस्पर्श करून घेतले आशीर्वाद

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा ते व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पायाला स्पर्श करताना दिसले. शिवराज सिंह यांनी त्यांच्या डोक्मयावर हात ठेवून प्रेमाने त्यांना आशीर्वाद दिला. मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता पीएचडी आहे. 2020 मध्ये त्यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापासून 2023 पर्यंत ते या मंत्रीपदावर राहिले.

नरेंद्र तोमर स्पीकर, दोन उपमुख्यमंत्री

निरीक्षकांच्या उपस्थितीत मोहन यादव यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड निश्चित झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा सादर केला. आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांची नावेही त्यांनी पत्रासोबत सादर केली. आता लवकरच शपथविधीचा मुहूर्त ठरणार आहे. यादव यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला या दोघांवर ही धुरा सोपविण्यात येणार आहे. तर माजी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना स्पीकर (विधानसभा अध्यक्ष) केले जाणार आहे. तसेच आता माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहन यादव यांची कारकीर्द

यादव यांची राजकीय कारकीर्द 1982 मध्ये सुरू झाली. 1982 मध्ये ते माधव सायन्स कॉलेज स्टुडंट युनियनचे सहसचिव होते. त्यानंतर 1984 मध्ये ते अध्यक्ष झाले. 1984 मध्ये यादव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उज्जैनचे शहर मंत्री झाले आणि 1986 मध्ये ते विभागाचे प्रमुख होते. 1988 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्य सहसचिव, खासदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. 1989-90 मध्ये ते परिषदेच्या राज्य युनिटचे राज्यमंत्री होते. यादव यांनी 1991-92 मध्ये परिषदेचे राष्ट्रीय मंत्रीपदही भूषवले होते. 2013 मध्ये ते  चौदाव्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून येत आमदार झाले. 2018 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून ते उच्च शिक्षण मंत्री झाले.

भाजपचे अनुभवी नेते

मोहन यादव यांच्या नावाची घोषणा उज्जैनच्या जनतेसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही. कारण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव कुठेही नव्हते, मात्र विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ते 2004 ते 2010 पर्यंत उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते तर 2011 ते 2013 पर्यंत त्यांनी मध्य प्रदेश पर्यटन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते आरएसएसचे सदस्यही आहेत. 2013 मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिणमधून निवडणूक लढवली होती. सलग तिसऱ्या निवडणुकीत ते येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा 12941 मतांनी पराभव केला. मोहन यादव यांना 95,699 मते मिळाली.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 230 सदस्यांच्या विधानसभेत 163 जागा जिंकून भाजपने मध्य प्रदेशात सत्ता कायम राखली, तर काँग्रेस 66 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कोणालाही सादर केले नाही आणि एक प्रकारे संपूर्ण प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर आधारित होता. मध्य प्रदेशात भाजप दोन दशकांत पाचव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. यापूर्वी 2003, 2008, 2013 आणि 2020 मध्ये राज्यात सत्ता आली होती.

Advertisement

.