For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक नंबर...मोडली इंग्रजांची कंबर!

06:58 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
एक नंबर   मोडली इंग्रजांची कंबर
Advertisement

मँचेस्टर कसोटी ड्रॉ, टीम इंडियाने इंग्लंडच्या विजयाचा घास हिसकावला :  चौथी कसोटी अनिर्णीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

शुभमन गिल आणि लोकेश राहुलच्या संयमी भागीदारीनंतर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाने दाखवलेल्या संयमासह झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढण्यात यश मिळवले. पहिला डाव 358 धावांवर आटोपल्यावर इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा करत 311 धावांची मोठी आघाडी घेत या सामन्यासह मालिका खिशात घालण्यासाठी परफेक्ट सेटअप केला होता. पण, पराभवाची तलवार डोक्यावर असताना केएल राहुल, कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा सामना आपल्या जिगरबाज खेळीने वाचवला.

Advertisement

पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघ 2-1 फरकाने आघाडीवर आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियावरील मालिका पराभवाचे संकट मात्र टळले आहे. दरम्यान, सामन्यात शतकी खेळी आणि सहा बळी घेणाऱ्या इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 31 जुलैपासून लंडन येथे खेळवला जाईल.

प्रारंभी, रविवारी भारतीय संघाने 174/2 च्या धावसंख्येने खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल ही नाबाद जोडी मैदानावर होती. पण, शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या केएलला 90 धावावर स्टोक्सने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार लगावले. यानंतर कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी करत आपले या मालिकेतील चौथे तर कसोटी कारकिर्दीतील नववे शतक झळकावले. गिलने 238 चेंडूत 12 चौकारांसह 103 धावांची खेळी साकारली. शतकानंतर मात्र तो लगेचच आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

जडेजा-सुंदर इंग्लंडवर पडले भारी

गिल बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने शतकी भागीदारी साकारली. या जोडीने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनीही संयमी खेळ तर केलाच, पण विकेट जाणार नाही याचीही काळजी घेतली. त्यांनी आधी भारताची पिछाडी भरून काढली आणि मग आघाडी मिळवण्यास सुरुवात केली. यादरम्यान सामन्याच्या अखेरीस ते दोघेही शतकाच्या जवळ असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हात मिळून सामना थांबवण्याची विनंती केली, पण जडेजा आणि सुंदर यांनी ही विनंती मान्य केली नाही. त्यानंतर दोघांनीही शतके पूर्ण केली. दोघांचीही शतके पूर्ण झाल्यानंतर मात्र दोघांनी इंग्लंडच्या कर्णधाराशी हात मिळवत हा सामना अनिर्णित राखला. जडेजा आणि सुंदर यांच्यात 203 धावांची नाबाद भागीदारी पाचव्या विकेटसाठी झाली. तसेच भारताने दुस्रया डावात 143 षटकात 4 बाद 425 धावा केल्या. जडेजा 107 धावांवर तर सुंदर 101 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक :भारत पहिला डाव 358 आणि दुसरा डाव 118 षटकांत 4 बाद 322 (यशस्वी जैस्वाल 0, केएल राहुल 90, साई सुदर्शन 0, शुभमन गिल 238 चेंडूत 12 चौकारासह 103, वॉशिंग्टन सुंदर206 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह नाबाद 101, जडेजा 185 चेंडूत 13 चौकार, 1 षटकारासह नाबाद 107, ख्रिस वोक्स 2 बळी, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स 1 बळी).

इंग्लंड पहिला डाव 669.

गिलची बॉर्डर-गावसकर क्लबमध्ये एंट्री

  1. भारताचा कर्णधार शुभमन गिलने शानदार शतकी खेळीसह अनेक विक्रम मोडीत काढले आहे. मँचेस्टरमध्ये कसोटी शतक झळकावून गिलने कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेमध्ये चार शतके झळकावली आहेत. यासह त्याने सर डॉन ब्रॅडमन आणि महान सुनील गावसकर यांची बरोबरी साधली आहे. शुभमन एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 4 शतके करणारा एकूण तिसरा तर भारताचा दुसरा कर्णधार ठरला. ब्रॅडमन आणि गावसकर या दोघांनी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून ही कामगिरी केली होती. तर शुभमनने परदेशात हा कारनामा करुन दाखवला आहे.
  2. मँचेस्टरमध्ये शतक : शुभमन मँचेस्टरमध्ये 1990 नंतर शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारतासाठी या मैदानात शेवटचे कसोटी शतक हे सचिन तेंडुलकरने केले होते. सचिनचे ते पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले होते. त्यानंतर एकाही भारताला अशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र आता शुभमनने शतक झळकावत साडे तीन दशकांची प्रतिक्षा संपवली. शुभमनआधी 1990 साली मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी 2 फलंदाजांनी शतक केलं होतं. पहिल्या डावात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने शतक तर दुसऱ्या डावात सचिनने शेकडा पूर्ण केला होता.

सुंदरचे पहिले तर जडेजाचे पाचवे शतक

इंग्लंडविरुद्ध जडेजाने नेहमीच अप्रतिम फलंदाजी केली आहे. या मालिकेत त्याने आधी 4 फिफ्टी केली होती, पण यावेळी त्याने आपले पाचवे शतक साजरे केले आहे. या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला हा सामना ड्रॉमध्ये सुरक्षित करण्यास मोठा हातभार लागला. विशेष म्हणजे, जडेजा इंग्लंडच्या मैदानावर नंबर 6 च्या खाली फलंदाजी करताना दोन शतके करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. जडेजाने या मालिकेत आतापर्यंत 454 धावा केल्या आहेत. याशिवाय,  वॉशिंग्टन सुंदरनेही या आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकवले. 101 धावांची खेळी त्याने साकारली.

Advertisement
Tags :

.