हिरेकोडीत विषबाधा विद्यार्थी संख्या 120 वर
12 विद्यार्थ्यांची अधिक उपचारासाठी बेळगावला रवानगी : उपचारानंतर अनेक विद्यार्थ्यांना पाठविले घरी
चिकोडी : येथून जवळच असलेल्या हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत अन्नातून अथवा पाण्यातून बाधा होऊन अस्वस्थ झालेल्या विद्यार्थ्यांच्या रुग्णसंख्येत वाढच होत आहे. शुक्रवारी 85 असलेली रुग्णसंख्या शनिवारी दुपारपर्यंत 120 पर्यंत पोहचली होती. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे. तर 20 विद्यार्थ्यांची तब्येत सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज दिल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. हिरेकोडी येथे मोरारजी निवासी शाळेत 428 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथे शुक्रवारी सकाळी काही विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने तेथे काही प्राथमिक उपचार करून सरकारी दवाखान्यात दाखल करण्यास प्रारंभ करण्यात आले. दिवसभर रुग्णसंख्या वाढत गेली. संध्याकाळपर्यंत 85 विद्यार्थी बाधित झाले होते. चिकोडी परिसरातील सर्व सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी येथे लक्ष ठेवून आहेत. निवासी शाळेतील पाण्याचे व अन्नाचे नमुने शुक्रवारीच घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. काही डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना पुन्हा त्रास झाल्याने रुग्णालयात आले आहेत. रुग्णालयात विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय महसूल, आरोग्य, शिक्षण खात्याचे अधिकारीही लक्ष ठेवून आहेत. काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व बालरोग तज्ञांनाही पाचारण करून उपचार करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या हळूहळू वाढतच आहे. सध्या निवासी शाळेला सुटी दिली असून तेथे असलेले विद्यार्थी त्रास झाल्यावर उपचारासाठी येत आहेत. चिकोडी तालुका रुग्णालय व माता-शिशू रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या फेऱ्या वाढल्याने रुग्णालयातील वर्दळ वाढली आहे. सर्वच खोल्यांत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. वारंवार रुग्णांची तपासणी केली जात आहे.
तर पालकही भयभीत अवस्थेत रुग्णालयात बसून आहेत. रुग्णांची तब्येत सुधारत असली तरी काही जणांना अजूनही उलटी व जुलाबाचा त्रास सुरू आहे. हिरेकोडी येथील काही रुग्णांना सकाळी सरकारी रुग्णालयात घेऊन आले. पुन्हा रुग्णवाहिकांचा आवाज ऐकून रुग्णसंख्या वाढल्याची भीती पालकांना वाटत होती. बेळगावला हलविलेल्या बारापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तब्येत व्यवस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दसरा सुट्टीसाठी घरी पाठवण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समजताच जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हिरेकोडी येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, यासाठी शाळा प्रशासनाला निवेदन दिले.