For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dowry Case Sangli : सांगलीत हुंडाबळीची संख्या वाढतीच, शिक्षा मात्र काडीमात्र!

01:30 PM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
dowry case sangli   सांगलीत हुंडाबळीची संख्या वाढतीच  शिक्षा मात्र काडीमात्र
Advertisement

मराठा समाजाने याबद्दल आता मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्याचे काम सुरू केलंय

Advertisement

By : विनायक जाधव

सांगली : बडेजाव आणि समाजासमोर आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करून अनेक लग्नसोहळे जिल्ह्यात झाले आहेत. पण याच बडेजावमुळे अनेक महिलांना हुंडाबळीचे शिकार व्हावे लागले आहे. याकडे आता समाजाने डोळसपणे बघण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मराठा समाजाने याबद्दल आता मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे.

Advertisement

हा बडेजाव जर मुलीच्या जीवावरच उठत असेल तर असला बडेजाव काय कामाचा असा सवाल आता समाजधुरिण करत आहेत. हा एक समाजात चांगला बदल होणारा संकेत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

या वैष्णवीला न्याय मिळवण्यासाठी तिचे कुंटुंब आटोकाट प्रयत्न करत आहे. असा प्रयत्न मात्र सांगली जिल्ह्यातील बळी गेलेल्या अनेक वैष्णवीच्या कुंटुंबांना करता आला नाही हेही तितकेच खरे आहे. अनेक खटल्यात काडीमात्रही शिक्षा झाली नाही हेही विदारक चित्र आहे!

हुंडाबळी म्हणजे काय?

हुंडाबळी हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत परिभाषित गुन्हा आहे, ज्यामध्ये लग्नानंतर सात वर्षांच्या आत हुंड्याच्या मागणीसाठी किंवा त्यासंबंधीच्या छळामुळे एखाद्या महिलेचा मृत्यू होतो, तेव्हा तो हुंडाबळी मानला जातो. यामध्ये आत्महत्या, हत्या किंवा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू यांचा समावेश होतो. हुंडा प्रथा ही सामाजिक दुष्ठ प्रथा आहे.

यामुळे अनेक महिलांना शारीरिक, मानसिक छळ आणि मृत्यूला सामोरे जावे लागते. कायदेशीर तरतुदीत भारतीय दंड संहिता कलमातंर्गत हुंडाबळीच्या प्रकरणात, जर एखाद्या महिलेचा मृत्यू लग्नाच्या सात वर्षांत हुंड्याच्या मागणीसाठी छळामुळे झाला असेल, तर दोषी व्यक्तीला सात वर्षांपासून आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. पती किंवा त्याच्या नातेवाइकांकडून हुंड्यासाठी छळ किंवा क्रूर वागणूक दिल्यास, तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१

हुंडा देणे, घेणे किंवा त्यासाठी मागणी करणे हा गुन्हा आहे. ज्यामध्ये पाच वर्षांपर्यंत कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. हुंडाबळीच्या प्रकरणात मृत्यू संशयास्पद असल्यास, न्यायालय दोषारोप स्विकारू शकते, जर मृत्यूपूर्वी हुंड्यासाठी छळ झाल्याचे सिद्ध झाले. तर सासरच्या मंडळींना शिक्षा लागू शकते.

हुंडाबळीची कारणे?

सामाजिक आणि सांस्कृतिकमधून ही हुंडा प्रथा निर्माण झाली. ही परंपरागत सामाजिक रचनेतून उद्भवते. जिथे वधूच्या कुटुंबाला वरपक्षाला पैसे, दागिने किंवा इतर भेटवस्तू द्याव्या लागतात. यात आर्थिक दबाव असतो. वधूच्या कुटुंबावर हुंडा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आजही दिसून येतो.

ज्यामुळे त्या मुलीच्या घरच्यांना कर्ज किंवा आर्थिक संकट निर्माण होते. ही परिस्थिती अनेक ठिकाणी पाहण्यात आली आहे. याबरोबरच स्त्रियांना दुय्यम स्थान दिल्याने त्यांच्यावर छळ आणि हिंसाचार होतो.

कायदेशीर अंमलबजावणीतील कमतरत

हुंडाबळीचे कायदे असूनही, सामाजिक मानसिकता आणि पोलिस यंत्रणेची उदासीनता यामुळे हुंडाबळीच्या घटना थांबत नाहीत. हुंडाबळीविरोधी उपाय आणि जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. यामध्ये सामाजिक जागरूकता मोहिमांद्वारे हुंडा प्रथेला विरोध करणे कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि त्वरित कारवाई महत्त्वाचे आहे. त्याचवेळी यामध्ये शिक्षेचे प्रमाण वाढू शकते. महिलांचे सक्षमीकरण नसणे. शिक्षण, रोजगार आणि कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता नसणे यांमुळे हुंडाबळी जात आहेत.

महाराष्ट्रात ९० टक्के गुन्हे दाखलच होत नाहीत

राष्ट्रीय महिला आयोग आणि स्थानिक पोलिस यंत्रणेद्वारे हेल्पलाइन (जसे १८१, १०९१) हे नंबर आहेत. महाराष्ट्रातील हुंडाबळीची आकडेवारी ही कचिंताजनक आहे. महाराष्ट्रात हुंडाबळी आणि हुंड्यासाठी छळाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

महाराष्ट्रात हुंडाबळीची प्रकरणे यामध्ये सन २०१७-२०२१ या कालावधीत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार ९९८ हुंडाबळीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीची १,३१७ प्रकरणे नोंदवली गेली.

सन २०२२-२०२५ या साडेतीन वर्षात (२०२२ ते मे २०२५) महाराष्ट्रात हुंड्यासाठी छळाची ३९,६६५ प्रकरणे नोंदवली गेली, म्हणजे दररोज त सरासरी ३२ महिलांचा छळ झाला. महाराष्ट्रात ९० टक्के कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीची प्रकरणे नोंदवली जात नाहीत. केवळ १० टक्के महिला गुन्हे दाखल करतात, ज्यामुळे वास्तविक आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असू शकतो.

कशा प्रकारे छळ होतो ?

हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ, आत्महत्या आणि हत्या यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरसारख्या शहरी भागात हुंडाबळी आणि छळाच्या घटना जास्त नोंदवल्या जातात. ग्रामीण भागातही हुंडाबळीच्या घटना घडतात. परंतु सामाजिक दबाव आणि जागरूकतेच्या अभावामुळे अनेक प्रकरणे दडपली जातात.

महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य असले तरी, हुंडा प्रथा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात कायम आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय कुटुंबांमध्ये हुंड्याची मागणी सामान्य आहे. महाराष्ट्रात पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय असले तरी, अनेक प्रकरणांमध्ये तक्रारींची योग्य दखल घेतली जात नाही.

यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' आणि स्थानिक हुंडाबळीच्या मोहिमांमुळे जागरूकता वाढत आहे. परंतु सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.

वैष्णवी हगवणे मुळे या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हुंड्यासाठी छळाच्या गंभीर बाबी समोर आल्या. यामुळे सामाजिक आणि कायदेशीर चर्चा तीव्र झाली आहे. हुंड्यासाठी छळामुळे अनेक महिला आत्महत्या करतात किंवा त्यांची हत्या केली जाते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यास कुटुंबाकडून त्रास दिला जातो.

हुंडाबळी रोखण्यासाठी मुर्लीना शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये त्वरित तपास आणि शिक्षा गरजेची आहे. हुंडा नाकारण्याची मानसिकता निर्माण करणे आणि समाजात लिंगसमानता रुजवणे. हा महत्त्वाचा प्रयत्न आता करण्याची गरज आहे. हुंडाबळी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील गंभीर सामाजिक समस्या आहे.

महाराष्ट्रात दररोज सरासरी ३२ महिलांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही प्रथा पूर्णपणे थांबवण्यासाठी समाज, सरकार आणि कायदेशीर यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. त्याचवेळी हे होवू शकते.

Advertisement
Tags :

.