कुर्मगड बेटावरील नृसिंह यात्रा उत्साहात
कारवार : येथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील कुर्मगड बेटावरील श्री नृसिंह देवाच्या जत्रेला गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. समुद्रातील जत्रा म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या या जत्रेसाठी हजारे भाविकांनी हजेरी लावली. कुर्मगडावर दाखल झालेल्या भाविकांमध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र सह अन्य राज्यातील भाविकांचा समावेश होता. कुर्मगडावर दाखल होण्यासाठी समुद्रमार्गे प्रवास करावा लागतो. यापूर्वी नृसिंह देवाच्या यात्रेच्या दिवशी काही दुर्घटना घडल्या आहे. त्यामुळे होडी दुर्घटनेमुळे काही भाविकांना जीवही गमवावा लागला आहे. इतिहासातील दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध लादले होते. कुर्मगडाकडे होड्या मार्गक्रमण करणाऱ्या मार्गावर वेगवेगळ्या सुरक्षा दलांचे जवान बारीक नजर ठेऊन होते. गुरुवारी सकाळी कडवाड येथून श्रीsंची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली. त्यानंतर आकर्षकरीत्या सजविण्यात आलेल्या होडीतून श्रींचे कुर्मगडावर प्रस्थान झाले. श्रींचे कुर्मगडावरील मंदिरात आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी झाले. श्रींच्या दर्शनासाठी अभिषेकासाठी नवस फेडण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी तुलाभाराद्वारे नवस फेडला. यावर्षी जिल्हा प्रशासनाने दहा वर्षाखालील बालकांच्या आणि वृद्धांच्या समुद्र प्रवासावर बंदी घातली होती. त्यामुळे कुर्मगडावर दाखल झालेल्या भाविकांमध्ये युवक आणि युवतींच्या भरणा अधिक होता.
मासेमारी बांधवांना श्री नृसिंह देव रक्षणकर्ता अशी श्रध्दा
अरबी समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या मासेमारी बांधवांचे श्री नृसिंह देवच रक्षण करतो अशी मासेमारी बांधवाची श्रध्दा असल्यामुळे यात्रेच्या दिवशी मासेमारी बांधव मासेमारी बंद ठेऊन आपल्या होड्या विनामोबदला भाविकांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून देतात. प्रत्येक होडी सजविलेली असते. इतकेच नव्हे तर होडीतून उतरलेल्या भाविकांना काही मासेमारी युवक आपल्या खांद्यावरून ने आण करीत असतात. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मासेमारी व बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनीही होडीतून प्रवास करून श्रींचे दर्शन घेतले.