झारखंडमध्ये एनआरसी लागू करणार
भारतीय जनता पक्षाचा निर्धार, बांगलादेशी घुसखोरांची समस्या गंभीर
वृत्तसंस्था / रांची
झारखंडच्या आदीवासी संथाल परगाणा क्षेत्रात बांगला देशातून मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी होत आहे. त्यामुळे या भागातील आदीवासींची संख्या घटत आहे. परिणामी, राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यास राष्ट्रीय नागरीक नोंदणी कायदा लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केली आहे. या राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होत आहे.
झारखंड राज्यात आदीवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बांगलादेशी मुस्लीम घुसखोर या भागांमधील आदीवासींच्या जमिनींवर अवैध कब्जा करीत आहेत. तसेच आदीवासींचे धर्मांतर करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास या राज्याच्या आदीवासी क्षेत्रांमध्ये आणि विशेषत: संथाल भागामध्ये लोकसंख्येचा असमतोल निर्माण होणार आहे. आदीवांसींच्या या भागांमधील संख्या झपाट्याने घटत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे सरकार असून या सरकारने लोकसंख्या असमतोलाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालविले असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपचे राज्य प्रभारी
शिवराजसिंग चौहान हे 17 वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. 2024 मध्ये त्यांनी विदिशा लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्क्य मिळवत निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर त्यांना केंद्रात कृषीमंत्रीपदाचे उत्तरदायित्व देण्यात आले असून त्यांच्यावर झारखंड राज्याच्या प्रभारीपदाची धुराही देण्यात आली आहे. या राज्यात महाराष्ट्रासमवेत नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आतापासूनच प्रचारकार्याचा प्रारंभ केला आहे.
भूमी, कन्या संरक्षण आवश्यक
झारखंडमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक केवळ एक मुख्यमंत्री निवडण्यासाठी नाही. या राज्यात सध्या आदीवासी जनता, या समाजाची भूमी आणि या समाजातील कन्या आणि महिला यांना गंभीर धोका विदेशी घुसखोरांपासून निर्माण झाला आहे. या धोक्यापासून त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. हाच या निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा राहणार आहे. भारतीय जनता पक्ष लवकरच आपले निवडणूक वचनपत्र सादर करणार असून त्यात या मुद्द्यावर भर दिला जाणार आहे. राज्यात आदीवासींचे धर्मांतर करुन त्यांची संख्या घटविण्याचे कारस्थान होत आहे. हे न रोखल्यास केवळ झारखंड नव्हे, तर देशाच्या सुरक्षेलाच आतून गंभीर धाका निर्माण होणार आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत लोकांनी योग्य विचार करुन आपल्या व्यापक हिताचे संरक्षण करणाऱ्या पक्षालाच विजयी करावे. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी विचारसरणीचा असल्याने या धोक्यांपासून जनतेचे संरक्षण करणे याच पक्षाला शक्य आहे, असे प्रतिपादन चौहान यांनी केले.
राज्य सरकारची फूस
राज्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्यास हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील राज्यसरकार जबाबदार आहे. या सरकारने आपली मतपेढी घट्ट करण्यासाठी बेकायदा घुसखोरीला चालना दिली आहे. आदीवासी नष्ट झाले तरी चालतील, पण आपली सत्ता टिकली पाहिजे अशा स्वार्थी विचाराने हे सरकार प्रेरित आहे. त्यामुळे त्याचे या निवडणुकीत पतन होणे अत्यावश्यक असून राज्यातील सूज्ञ जनता हे परिवर्तन याच निवडणुकीत घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. लवकरच निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.