मणिपूरमध्ये ‘एनपीपी’कडून भाजप सरकारचा पाठिंबा मागे
बिरेन सिंग सरकारला सध्या धोका नाही
► वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. तथापि, एनपीपीच्या 7 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतरही सरकार अस्थिर होणार नाही. मात्र, राज्यातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांना लिहिलेल्या अधिकृत पत्रात एनपीपीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग राज्यातील जातीय हिंसाचार नियंत्रित करण्यात आणि राज्यातील सामान्य स्थिती पूर्वपदावर आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर राज्यातील बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा तात्काळ प्रभावाने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे कळविण्यात आले आहे.
एनपीपीने बिरेन सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला असला तरी सध्या सरकारला कोणताही धोका नाही. 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 5, जेडीयूने 6, नागा पीपल्स फ्रंट 5, कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने 7, कुकी पीपल्स अलायन्सने 2 आणि अपक्षांनी 3 जागा जिंकल्या होत्या. 60 सदस्यीय मणिपूर विधानसभेत बहुमताचा आकडा 31 असल्यामुळे भाजपकडे स्वत:चे 32 आमदार आहेत. तसेच जेडीयूच्या 6 पैकी 5 आमदारांनी औपचारिकपणे भाजपात प्रवेश केल्याने विधानसभेतील भाजप सदस्यांची संख्या 37 वर पोहोचलेली आहे. साहजिकच मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडे स्वबळावर बहुमत आहे.