महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एन.पी की एम.बी....?

06:39 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुलभा पुरुषा राजन् सततं प्रियवादिन?। ’

Advertisement

‘अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ’

Advertisement

अर्थ- हे राजा, नेहमी प्रिय बोलणारे आणि ऐकणारे पुरुष सहज आढळतील पण अप्रिय परंतु हिताचे बोलणारा व ते ऐकणारा हे दोघेही दुर्लभ आहेत.

संस्कृत सुभाषित वाचलं आणि मला आमच्या व्हॉट्सअप वर आलेल्या या वरच्या वाक्याची आठवण आली. एन.पी.... नेहरू प्रेमी की एम.बी ...मोदी भक्त असे दोन ग्रुप सगळ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वसाधारणपणे सतत काही ना काही बोलत असतात, लिहीत असतात किंवा वाचनीय असं काहीतरी टाकत असतात. कोणी वाचो, न वाचो ...बोलो न बोलो पण त्यांचं हे काम अव्याहत सुरू असतं. या व्हॉट्सअपमुळे माझ्या एक गोष्ट मात्र लक्षात आली की जागतिक दाखले देणारी ही सर्व मंडळी व्हॉट्सअपमुळे फार समृद्ध झाली. खरंतर या सगळ्यांना शाळेत असताना कोणत्याही इतिहासाच्या सनावळ्या अजिबात पाठ नसायच्या परंतु आता मात्र कोर्टात उभे राहिल्यासारखे प्रत्येक गोष्टींचे दाखले देऊन तावातावाने भांडत असतात. यांना एकवेळ घरच्या नातेवाईकांची नावे पटकन आठवायची नाहीत पण कलाकारांची लफडी किंवा उद्योग किंवा भ्रष्टाचार यांची यादी मात्र तोंडपाठ जाहीर करून भाष्य चालू असते. खरं तर या सगळ्यांना बऱ्यापैकी स्वत:चे आयुष्य मार्गी कसे लागणार हे मुळीच माहिती नसतं, पण जागतिक सत्तेबद्दल खात्रीपूर्वक बोलत असतात. अगदी आमच्या सगळ्यांची अवस्था या रस्त्यावरच्या भविष्य सांगणाऱ्या माणसासारखी असते. सगळ्या जगाचे भविष्य सांगतो पण स्वत:चं भविष्य मात्र अंधारात. खरं तर आमचे काय होणार याबद्दल डोळेझाक करून दुसऱ्याच्या दोषांची जंत्री करणारे आम्ही सर्व व्हॉट्सअप संघटनेचे सभासद. स्वत:ला आवडणारे सर्वच विचार जागतिक दर्जाचे कसे आहेत हे सांगणारे हे सर्व शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक तज्ञ, बुद्धिवादी संघटनेचे सभासद जगाच्या गप्पा हाणायला रोजच सिद्ध झालेले असतात. आमच्या काळात अमुक एक चांगलं होतं. आम्ही सगळं काही चांगलं केलं आणि आत्ताचे लोक मात्र सगळा देश विकायला निघालेत. सगळा देश रसातळाला चाललाय अशा अविर्भावाची दोन्ही गटांची बोलणी वाचली किंवा ऐकली की मग लक्षात येतं. आम्ही सर्व रिकामटेकडे एका वेगळ्याच स्पर्धेमध्ये अडकलेलो आहोत. तुम्ही कसे वाईट आणि मी कसा चांगला एवढीच उदाहरणं देत आम्ही सातत्याने बोलू लागतो. अगदी पैसे लावतो, बोलतो, भांडतो, अगदी शेवटी व्हॉट्सअपवरच्या ग्रुपवरून गायबसुद्धा होतो किंवा टोकाचं शत्रुत्व निर्माण होतं. अशा सगळ्या लोकांना मी एकदा सहजच प्रश्न टाकला की तुम्ही हे जे सगळं बोलताय किंवा सांगताय त्याचा तुम्हाला स्वत:ला फायदा काय? तुमच्या पगारात, नोकरीत किंवा घरच्या परिस्थितीत किंवा तुमच्या आजारपणात काही बदल घडणार आहेत का? ह्याचे उत्तर सगळ्यांनी काही नाही असं दिलं. मग आपण नेमका वाद कोणासाठी घातला तेच आम्हाला कळत नाही. ही कौतुक करणारी मंडळी किंवा दुसऱ्याची नाच्चकी करणारी मंडळी विचार करत बसली कारण ते ज्यांच्याबद्दल बोलत असतात ती मंडळी स्वार्थी राजकारणात येऊन स्वत:चा फायदा करून राजीनामे देऊन केव्हाच निघून गेलेले असतात. तुम्ही बोलणारे त्यांच्या खिचगणतीतसुद्धा नसता. मग अशा लोकांचा पाठपुरावा आम्ही का करायचा? अशा लोकांबद्दल बोलण्यापेक्षा मी चांगलं काय केलंय? मला चांगलं काय करता येईल? किंवा जे प्रश्न आम्ही सरकारला सातत्याने विचारतो, त्याच्याबद्दल आम्हाला काही उपाय सांगता येतील का? याबद्दल मात्र कुणीही बोलत नाही आणि आमच्या स्वत:च्या परिस्थितीत कोणतेही बदल घडत नाही तरीही आम्ही उगीचच स्वयंघोषित कार्यकर्त्यांप्रमाणे प्रत्येकाचे झेंडे घेऊन फिरत असतो किंवा बोलतच असतो. अशावेळी आम्ही खरं म्हणजे शिकलेले अडाणी ठरतो. कारण कुणीही आम्हाला ऑफर दिलेली नसताना किंवा पैसे दिलेले नसताना आम्ही वाईट बोलून काय किंवा चांगलं बोलून त्यांची जाहिरात करत हिंडत असतो.

पूर्वार्ध

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article