For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्देशांकाचा फुगा...

06:44 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
निर्देशांकाचा फुगा
Advertisement

अमेरिकेतील मंदीचे मळभ, बँक ऑफ जपानचे वाढीव व्याजदर, पश्चिम आशियातील संघर्षपूर्ण स्थिती अन् एकूणच जागतिक पातळीवरील अस्थिरता हेच घटक प्रामुख्याने ब्लॅक मंडे वा जागतिक शेअर बाजारातील घसरणीच्या मुळाशी असल्याचे दिसून येते. चढ आणि उतार हे शेअर मार्केटचे व्यवच्छेदक लक्षण होय. एखादी सकारात्मक घटना निर्देशांक उसळण्यासाठी जशी कारणीभूत ठरते, तशीच नकारात्मक बाब बाजार कोसळण्यास पुरेशी ठरते, हा आजवरचा इतिहास होय. त्यातून एकप्रकारे शेअर बाजाराची संवेदनशीलता तसेच लहरीपणाही अधोरेखित होतो. अर्थात मोठ्या घसरणीनंतर आता बाजार सावरला असला, तरी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ मंडळी सांगतात. एकूणच जगाचा बिघडलेला पोत पाहता हा इशारा योग्यच म्हणायला हवा. जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिका हा आजही प्रमुख देश म्हणून गणला जातो. तेथील बारीक सारीक घटनांचेही जगभर पडसाद उमटत असतात. मग ते राजकीय स्थित्यंतर असो किंवा रोजगार, आर्थिक किंवा अन्य कुठलीही घटना असो. अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने अलीकडेच आपला रोजगारविषयक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून या देशातील बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली दिसते. त्यानुसार जुलै 2024 मध्ये अमेरिकेत 3.52 लाख लोक बेरोजगार झाले असून, एकूण बेरोजगारांची संख्या 72 लाखांवर पोहोचल्याचे आकडेवारी सांगते. आत्तापर्यंत अमेरिकेत मासिक 2.15 लाख इतक्या नोकऱ्या निर्माण होत होत्या. मात्र, त्यात आता लक्षणीय घट झाली असून, बेरोजगारीचा दर तब्बल 4.3 टक्क्यांवर गेला आहे. अमेरिकेत साधारणपणे 17 लाख लोकांना नोकरीवरून कायमस्वऊपी काढून टाकण्यात आले आहे. तर 11 लाख लोकांना हंगामी नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. रोजगाराचे हे संकट म्हणजे संभाव्य मंदीची नांदीच होय. त्यात अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत मिळाले, की गुंतवणूकदार आपला बाजारातील पैसा काढून घेतात, हा आजवरचा अनुभव आहे. मंदीचं मळभ गडद झाल्यानेच आत्ताही देशोदेशीचे बाजार घसरल्याचे दिसून येते. मुळात भारत आणि अमेरिका यांच्यातील धागे परस्परांशी अत्यंत घट्टपणे विणले गेले आहे. अमेरिकेत भारतीयांची संख्या लक्षणीय असून, काही गावे वा नगरे ही खास भारतीयांची म्हणूनही ओळखली जातात. स्वाभाविकच अमेरिकेवर बेरोजगारीच्या संकटाची छाया पसरत असेल, तर त्याची झळ भारताला वा भारतीयांनाही बसू शकते. भारतातील वाहन, ऊर्जा व आयटी क्षेsत्रातील कंपन्या अमेरिकेवर बव्हंशी अवलंबून आहेत. त्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यामुळेच ब्लॅक मंडेतील पडझडीत या कंपन्यांचे शेअर कोसळले, असे म्हणण्यास वाव आहे. बेरोजगारीमुळे उत्पादनात घट होईल, मागणीही घटेल व त्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवरही होईल, असेही मानले जाते. मात्र, केवळ हा एकमेवच घटक बाजार उठण्यास जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. अमेरिका हा देश मागच्या काही दिवसांपासून राजकीय स्थित्यंतरातून जात आहे. येथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीनेही वेगळे वळण घेतले आहे. त्याचीही धग अर्थकारणास बसत असल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूला पश्चिम आशियातील इराण व इस्राईलमध्ये सध्या युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. कोणत्याही दोन किंवा अधिक देशांमध्ये युद्ध किंवा युद्धजन्य स्थिती उद्भवते, तेव्हा त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम हे संबंध जगावर होत असतात. पश्चिम आशियातील संघर्षाबद्दलही तसेच म्हणता येईल. हमास प्रमुखाच्या हत्येनंतर या दोन देशांमधील तणाव आणखीनच वाढला असून, खनिज तेलाच्या किमतीही भडकण्याची भीती आहे. सांप्रत संकटाचे हेही एक कारण. जपान हाही जागतिक अर्थकारणातला महत्त्वाचा देश. जपानच्या केंद्रीय बँकेने जवळपास 14 वर्षांनंतर व्याजदारांमध्ये 0.25 टक्के इतकी वाढ केली. त्याचाही शेअर बाजारावर परिणाम झाल्याचे या क्षेत्रातील मंडळी सांगतात. यानंतर जपानचा बाजार निक्केई 12 टक्क्यांनी घसरला. तर तैवानच्या बाजारातही मागच्या 57 वर्षांतील सर्वांत मोठी घसरण झाली. 2020 च्या कोरोना महामारीत जागतिक बाजाराला मोठा फटका बसला होता. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्स अगदी 30 हजारांच्या खाली आला होता. त्यापूर्वी 2016 मध्ये नोटबंदीच्या वेळी मार्केट 6 टक्क्यांनी घसरले, तर 2008 च्या आर्थिक मंदीत निर्देशांक 1400 अंकांनी घसरल्याचा इतिहास फार जुना नाही. तर 1992 मध्ये हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर निर्देशांकाने पार 2 हजार अंकांनी आपटी खाल्ली होती. अर्थात कोरोनानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला, तर मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजाराचा आलेख सातत्याने उंचावताना दिसतो. 50 हजार, 75 हजारांहून मागच्या काही दिवसांत निर्देशांकाची वाटचाल लाखाच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसून येते. पूर्वी मध्यमवर्गीयांचा कल हा बचतीकडे असे. आता म्युच्युअल फंड वा शेअर मार्केटकडे लोकांचा अधिकचा कल पहायला मिळतो. डि-मॅट अकाऊंंट उघडलेल्यांची संख्या 15 ते 16 कोटींवर पोहोचणे, यातूनच काय ते स्पष्ट होते. अर्थात गुंतवणुकीचे कोणतेही पर्याय स्वीकारताना सावधानता व अभ्यास आवश्यक ठरतो. भारतातील शेअर बाजार सोमवारी दोन हजार अंकांनी कोसळल्यानंतर पुन्हा मंगळवारी त्यात सुधारण झाली. मात्र, या सगळ्यात गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी ऊपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. यातून योग्य तो बोध घ्यावा. मुळात अर्थ साक्षर होण्याचा प्रयत्न करायला हवा. म्युच्युअल फंड वा शेअर बाजाराचा मार्ग अवलंबणे गैर नाही. परंतु, बचतीचे विविध पारंपरिक मार्गही महत्त्वाचे, हे विसरू नये. शेअर बाजारात संयम अत्यावश्यक. मार्केट पडले म्हणून हताश होऊन चालत नाही व वधारले म्हणजे हुरळून चालत नाही. शेवटी फुगे फुटत असतात. ‘वॉरेन बफे इंडिकेटर’ने तसा इशाराही दिला होता. एकूणच काय तर जागते रहो!

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.