आजकाल खेळामध्ये फिजिओथेरपीचे महत्त्व वाढले
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी : काहेरतर्फे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यक्रम
बेळगाव : पूर्वी फिजिओथेरपीशिवाय खेळ खेळणे कठीण जात होते. मात्र आता फिजिओथेरपी लोकप्रिय झाली असून खेळामध्ये फिजिओथेरपी अत्यावश्यक आहे. आजकाल खेळामध्ये फिजिओथेरपीचे महत्त्व वाढले आहे. 14 वर्षांखालील ते वरिष्ठ खेळाडूंपर्यंत, देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय खेळामध्ये फिजिओथेरपी आवश्यक आहे, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार व अर्जुन व पद्मश्री पुरस्कार विजेत्या डायना एडुल्जी यांनी व्यक्त केले.
काहेर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी विभागाच्यावतीने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स पर्ल फिजिओकॉन-2025 कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. व्यासपीठावर काहेरचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. संजीवकुमार, डॉ. विजय कागे, डॉ. दीपा मेटगुड उपस्थित होते. एडुल्जी wपुढे म्हणाल्या, फिजिओथेरपी हे निश्चितच सर्वांसाठी करिअरचे माध्यम आहे. आज महिला संघात 15 खेळाडू असून, त्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी पडद्यामागे 15 ते 20 लोक काम करत असतात. फिजिओथेरपी हे खूप कठीण काम असले तरी फिजिओथेरपी उपचार प्रभावी असतात, असे त्यांनी सांगितले.
गोव्यात फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करणार
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, गोव्यात फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक हॉस्पिटल व प्रशिक्षण केंद्राच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासह उपचार व प्रशिक्षण आपले कर्तव्य आहे. हुबळी येथे निर्माण करण्यात आलेले 1 हजार बेड्सच्या हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. शेती, शिक्षण, आरोग्य व संशोधनाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यात येणार आहे. आपण राज्यसभा सदस्य असताना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले होते. आता याची प्रत्यक्षपणे स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्य अलाईड व हेल्थकेअर कौन्सिलचे चेअरमन डॉ. ईफ्तिकर अली, केंद्र सरकारचे फिजिओथेरपी प्रोफेशन कौन्सिलचे सदस्य डॉ. अली इराणी, डॉ. व्ही, पी. गुप्ता, डॉ. आशिष कक्कड, केतन भाटीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.