आता मिळणार ‘मांसाहारी तांदूळ’
आता खा ‘मांसाहारी तांदूळ’
स्वतंत्रपणे मांस निर्माण करण्याची नाही गरज
मांस सेवन अनेक लोकांना अत्यंत आवडत असते. मांसाहारात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि झिंक यासारखे पोषक घटक सामील असतात. परंतु मांस खाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आता वैज्ञानिकांनी अशाप्रकारचा तांदूळ निर्माण केला आहे, जो पूर्णपणे मांसाची चव मिळवून देतो. हा तांदूळ तुम्ही बिर्याणीमधून खाऊ शकता आणि लोकांना स्वतंत्रपणे मांस विकत आणण्याची गरज नाही. वैज्ञानिकांनी याला मांसाहारी तांदूळ हेच नाव दिले आहे.
दक्षिण कोरियाच्या योनसेई युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत हे हायब्रिड राइस तयार केले आहे. यात अनेक प्रकारच्या मांसाला मिसळविण्यात आले आहे. तसेच यात माशांचा स्वादही आहे. संशोधकांनुसार हा तांदूळ सर्वसामान्य तांदळासारखाच दिसून येतो, परंतु सामान्य मीटच्या तुलनेत यात 8 टक्के अधिक प्रोटीन आणि 7 टक्के अधिक फॅट असते. विशेष म्हणजे 11 दिवसांपर्यंत हे खराब् होत नाही अणि सामान्य तापमानातही हे साठवून ठेवता येते. हे तांदूळ स्नायूंना आवश्यक पोषक घटक प्रदान करतात.
याच्या वैशिष्ट्यामुळे युद्ध आणि आपत्कालीन स्थितीत या तांदळाचा वापर केला जाऊ शकतो. सैन्यांकरताही याचा वापर होऊ शकतो. कुपोषण दूर करण्यासाठी हा तांदूळ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रोटीनचा हा एक किफायतशीर पर्याय ठरू शकतो. याची निर्मितीप्रक्रिया अत्यंत सोपी असल्याने अनेक प्राणी पाळण्याची आणि शेती करण्याची गरजच संपुष्टात येणार असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
मॅटर जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार याच्या उत्पादनामुळे कार्बन उत्सर्जन होणार नाही. 100 ग्रॅम प्रोटीनसाठी मांस खाल्ल्यास 49.89 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते, तर हायब्रिड तांदळामुळे केवळ 6.27 किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन होणार आहे. सर्वसाधारणपणे मांसाहारातून प्रोटीन प्राप्त केले जाते, परंतु याकरता प्राणी पाळण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रीनहाउस गॅस तयार होतो. यापूर्वी 2013 मध्ये लंडनच्या वैज्ञानिकाने अनोखा मांसाहारी बर्गर तयार केला होता.