मडकईत आता ग्रामस्थ विरुद्ध पुरोहित
मारहाण, धक्काबुक्कीच्या परस्परांविऊद्ध तक्रारी : नवमीला मंदिर परिसरात तणाव : पोलिस तैनात ,पूर्वी महाजन विरुद्ध ग्रामस्थांत होता वाद
फोंडा, मडकई : तब्बल दहा वर्षानंतर मडकई येथील श्री नवदुर्गा देवस्थानशी संबंधीत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावेळी ग्रामस्थ विऊद्ध पुरोहित यांच्यात हा वाद पेटला आहे. देवीचा वार्षिक जत्रोत्सव व अन्य उत्सवांच्यावेळी भेटीदाखल येणाऱ्या ओटी व अन्य साहित्य कुणी स्वीकारायचे हे या वादामागील मुख्य कारण आहे. काल सोमवारी नवमी असल्याने मंदिरात जमलेले ग्रामस्थ व पुरोहित यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान धक्काबुक्कीत झाले. पुरोहित विभव घैसास याला मारहाण केल्याची तक्रार ग्रामस्थांविरोधात तर ग्रामस्थ महिलांना धक्काबुक्की केल्याने विनयभंग झाल्याची तक्रार पुरोहितांपैकी दोघांविऊद्ध म्हार्दोळ पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. दोन्ही तक्रारी पुढील कारवाईसाठी उपजिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ग्रामस्थ व पुरोहित यांच्यात नव्याने सुऊ झालेल्या या वादामुळे मडकई मंदिर परिसरात तणावाचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्री नवदुर्गा देवीच्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जत्रोत्सवाच्या काळात नौकाविहाराच्या आदल्या दिवशी मंदिरात दोन्ही गटांमध्ये अशाच प्रकारे वाद होऊन काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पुरोहित कुटुंबातील गौरव घैसास यांनी काही ग्रामस्थांविरोधात म्हार्दोळ पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी हे प्रकरण निवळले असे वाटत असतानाच सोमवारी नवमीच्यादिवशी पुन्हा वादाला तोंड फुटले.
नवदुर्गा देवीच्या जत्रोत्सवानंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या संप्रेक्षण नवमीला मडकईतील ग्रामस्थांसह गोव्याच्या विविध भागातून देवीला ओटी अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने सुवासिनी उपस्थिती लावतात. देवीच्या गर्भकुडीपर्यंत जाऊन ही सेवा अर्पण करण्याची व्यवस्था यादिवशी केली जाते. त्यामुळे सोमवारी संप्रेक्षण नवमीला सकाळी 6 वा. पासून मंदिरात सुवासिनींच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी भेटीदाखल आलेले साहित्य तेथे उपस्थित असलेल्या घैसास कुटुंबातील पुरोहितांना स्वीकारण्यास तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी विरोध केला. हे साहित्य देवस्थानाच्या उत्सवाचा खर्च भागविण्यासाठी जमा करावे असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. तर देवीला भेटीदाखल येणाऱ्या साहित्यावर पुरोहितांचा परंपरागत हक्क असल्याने त्यावर ग्रामस्थांना दावा करता येणार नाही. या मुद्द्यावऊन त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. पोलिसांसमक्ष हा प्रकार घडत असताना, काही लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेरावर या घटनेचे चित्रीकरण केले. ग्रामस्थांनी हे साहित्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुरोहितांनी त्याला विरोध केल्याने प्रकरण धक्काबुक्कीवर पोचले. त्यामुळे मंदिरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण निवळले. मात्र गावात तणाव कायम आहे. रात्री होणाऱ्या पालखी उत्सवाच्यावेळी हा वाद पुन्हा उफाळू नये यासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
परंपरागत उत्पन्न हिरावून घेता येणार नाही : पुरोहित घैसास
दरम्यान या प्रकरणी आपली बाजू मांडताना पुरोहित कुटुंबातील गौरव घैसास यांनी देवीला भेटीदाखल येणारे नारळ, तांदूळ, ताटातील पैसे व अन्य साहित्यावर परंपरेनुसार आपल्या कुटुंबीयांचा अधिकार असल्याचे सांगितले. नुकताच उच्च न्यायालयाने तसा आदेशही दिला आहे. हे उत्पन्न ग्रामस्थांपैकी काही लोक हिसकावून घेऊन आमचा अधिकार नाकारत आहेत. त्याला विरोध केल्यानेच हा वाद निर्माण झाला आहे. त्यातूनच सकाळी मंदिरात सेवा देऊन घरी परतत असताना वाटेत विभव घैसास यांना अडवून सनत नाईक व प्रतिक नाईक या दोघा युवकांनी मारहाण केल्याचा आरोप गौरव घैसास यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना केला. या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसस्थानकात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी जो ग्रामस्थ व महाजनांच्या व्यवस्थापन समितीतर्फे मूळ मूर्ती बदलण्यावऊन वाद झाला, त्यावेळी परंपरागत घैसास कुटुंबाने ज्या मूर्तीची पूजा केली ती बदलण्यास आमचा विरोध होता. आजही या गोष्टीला विरोध असल्याचे गौरव घैसास यांनी सांगितले. पण देवीच्या सेवेतून येणाऱ्या परंपरागत उत्पन्नावरील आमचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही. मध्यंतरी सन 2008 साली देवस्थान समितीने पुरोहित म्हणून आमची सेवा खंडित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती व न्यायालयाने निकाल आमच्या बाजूने दिला तसेच उत्पन्नाचा अधिकारही कायम ठेवला, असेही त्यांनी सांगितले. मूर्ती बदलण्याच्या वादावऊन आमचे परंपरागत उत्पन्न काढून घेण्यावर हा वाद पोचला आहे. यावेळी प्रशांत घैसास व नितीन घैसास हे उपस्थित होते.
पुरोहित देवस्थानवर अधिकार गाजवण्यासाठी नाहीत : ग्रामस्थ
पुरोहित घैसास कुटुंबातील विभव घैसास याला ग्रामस्थांपैकी दोघा युवकांनी मारहाण केल्याचे ग्रामस्थांनी स्पष्टपणे नाकारले आहे. सोमवारी संप्रेक्षण नवमी असल्याने ग्रामस्थ कुळावी व अन्य भागातील महिला भाविक देवीची ओटी भरण्यासाठी सकाळी 6 वा. पासून मंदिरात रांगा लावल्या होत्या. मात्र पाच मिनिटांनी रांग थांबल्याने ग्रामस्थ गर्भकुडीकडे गेले, तेव्हा पुरोहितांनी शिस्तीचा मुद्दा उपस्थित कऊन महिला भाविकांचा अपमान केला. त्यातून तोंडी बाचाबाचीला सुऊवात झाली. गावातील एकादोन महिलांना धक्काबुक्की केल्याने हा तणाव निर्माण झाला. ज्या महिलांना ही धक्काबुक्की करण्यात आली, त्यांच्या मुलांना राग आल्याने त्यांनी विभव घैसास याला जाब विचारला. पण मारहाण केलेली नाही.
जत्रोत्सवाच्या काळात भाविकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी गावातील महिलांनीच पुढाकार घेऊन येथील व्यवस्था सांभाळली. आम्ही देवीला येणाऱ्या उत्पन्नाच्या आशेने ही सेवा दिलेली नाही. यापूर्वी मंदिराचे व्यवस्थापन मामलेदारांकडे होते, तेव्हाही भाविकांनी देवीला अर्पण केलेले साहित्य बराच काळ मंदिराच्या गोदामात पडून होते. देवस्थानमध्ये पुरोहित हे सेवेसाठी असतात, त्यांना देवस्थानवर मालकीहक्क गाजविण्याचा अधिकार नाही. देवी सर्वांची आहे, असे सतीश नाईक व विशाखा गडांबी या ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितले. मूर्ती बदलण्यावऊन काही वर्षांपूर्वी महाजन व ग्रामस्थांमध्ये जो वाद निर्माण झाला, त्याला ग्रामस्थांनी पाठिंबा द्यावा असे मडकई गावातील सातही वाड्यावर फिऊन पुरोहित घैसास कुटुंबानी मदतीची याचना केली होती. आज त्यांचा स्वार्थ साधल्याने ते गावावर उलटले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.